कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या नाकाबंदीत मोटारीतून ६२लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम पकडण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असून,आतापर्यंत अशाप्रकारे एक कोटीहून अधिक रक्कम पकडण्यात आली आहे.

सोमवारी करण्यात आलेल्या या कारवाईत पकडण्यात आलेली ही रक्कम शशिकांत भीमा चिगरी (२८,रा. पाचगाव,ता.करवीर) यांच्याकडे मिळाली. या रकमेबाबत चौकशी करून, यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता त्यांनी असमर्थता दर्शविल्याने ही सर्व रक्कम पंचनामा करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे.

आज दुपारी दीडच्या सुमारास पुणे—बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन कोल्हापूर शहरात प्रवेश केल्यानंतर या गाडीच्या तपासणीत ही रक्कम आढळून आली. ही कारवाई शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे,हर्षजित घाटगे,नोडल ऑफिसर, आचारसहिंता व्यवस्थापन, २७६ विधानसभा मतदारसंघ, पो.उपनिरीक्षक आदिंनी केली. या रकमेच्या अधिक चौकशीसाठी आयकर विभागाला कळविण्यात आले आहे.