कोल्हापूर : मोबाईल हरवला की तो पुन्हा सापडण्याची अपेक्षा अनेकांनी सोडलेली असते. पण अशा धीर हरवलेल्या शेकडो जणांना त्यांचे मोबाईल मिळवून देण्याचे काम कोल्हापूर पोलिसांनी केले आहे. तब्बल १ कोटी २५ हजार रुपये इतकी त्याची किंमत आहे.
मोबाईल हरवल्यामुळे आणि तो परत मिळण्याची कोणतीही आशा उरली नसलेल्या ४०० नागरिकांना कोल्हापूर सायबर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. तांत्रिक तपास, मोबाईल कंपन्यांशी समन्वय आणि ‘सीईआयआर’ पोर्टलच्या प्रभावी माध्यमातून विविध जिल्ह्यांमधून त्यांचे मोबाईल संच शोधून हस्तगत करण्यात आले आहेत.
कोल्हापूर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या आदेशानुसार, सायबर पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी यासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती. सतत महिनाभर राबवलेल्या कसून तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा अचूक माग काढला आणि ते जप्त करण्यात यश मिळवले.
कर्नाटकात शोध
शोधण्यात आलेले हे मोबाईल संच केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारील कर्नाटक राज्याच्या विविध जिल्ह्यांमधूनही शोधून आणले गेले आहेत. ३ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते कागदपत्रे व ओळख पटवून हे मोबाईल प्रत्यक्ष नागरिकांना परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल अचानक हातात पडल्याने नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
शोध सुरूच
सायबर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी विशेष कौतुक केले असून, नागरिकांचे गहाळ मोबाईल शोधून परत करण्याची ही मोहीम यापुढेही अशीच गांभीर्याने सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.
मोबाईल हरवल्याने
मोबाईल हरवल्यावर वैयक्तिक डेटा चोरीला जाणे, सिम कार्डचा गैरवापर होणे आणि आर्थिक फसवणूक होण्याची भीती असते. फोनमधील फोटो, कॉन्टॅक्ट्स आणि वैयक्तिक माहिती अनधिकृत व्यक्तीच्या हातात पडू शकते. कोणीतरी तुमच्या नंबरवरून चुकीचे कॉल किंवा मेसेज करू शकते.यूपीआय किंवा बँकिंग ॲप्सचा गैरवापर करून पैसे काढले जाऊ शकतात. इंटरनेट किंवा फोन बंद असल्यास अचूक स्थान मिळवणे अवघड होते. तुमच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल करा आणि सिमकार्ड ताबडतोब ब्लॉक करा. याचा फायदा असा होईल की चोर तुमच्या सिमकार्डचा गैरवापर करू शकणार नाही आणि तुम्ही कोणत्याही नव्या अडचणीत सापडणार नाही.
