कोल्हापूर : शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी येथील राजारामपुरी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद तापत चालला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून दिलेल्या धमकीप्रकरणी पोलिसांनी मध्यरात्री वकिलांचा सल्ला घेतला. त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
तथापि, आंबी कुटुंबीय आणि डाव्या चळवळीतील संघटनांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने आंबी कुटुंब आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गायकवाड यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळासह राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. संजय गायकवाड यांची विधाने नेहमीच वादग्रस्त आणि महिलांचा अवमान करणारी असतात. आता त्यांनी थेट धमकावण्यापर्यंत मजल मारली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पाठपुरावा सोडू देणार नाही, असा इशारा शिष्टमंडळाने दिला होता. या मागणीचे निवेदन राजारामपुरी पोलिसांना देण्यात आले होते.
सोमवारी पुन्हा आंदोलन
त्यानंतरही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी सौम्य कलमान्वये गुन्हा नोंदवल्याचा आरोप आंबी कुटुंबीय, चळवळीतील संघटनांनी केला आहे. याप्रकरणी सोमवारी कोल्हापुरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शनिवारी देण्यात आला.
गृहमंत्र्यांचा पुतळा जाळणार
आमदार संजय गायकवाड यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिलेले या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी पोलिसांकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत दखलपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. पोलिसांनी वेळ काढू भूमिका घेत गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा आरोप करून त्यांनी या विरोधात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा दहन करून पोलीस प्रशासनाचा निषेध करणार असल्याचे आज कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. धीरज कुमार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
रस्त्यावरची लढाई सुरू
पुस्तकावरून वाद सुरू होऊन आज पाच दिवस उलटले तरीही शिवसेनेचे बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. पोलीस प्रशासनावर नेमका कुणाचा दबाव आहे, याची उत्तर पोलिसांनी द्यावीत. कोल्हापुरातील सर्व पुरोगामी संघटना आणि आमदार रोहित पवार यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठीय्या आंदोलन केले. तरीही या सर्वांची पाठ फिरताच पोलीस प्रशासनाने आमची दिशाभूल, फसवणूक केली असा आरोप प्रशांत अंबी, गिरीश फोंडे, दीपक केदार यांनी केला. आता आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करणार असल्याचं प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सांगितले.
