सांगली : रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन सह्याद्री एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रकार शनिवारी पहाटे शेणोली (ता. कराड) येथे घडला असून याबाबत मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कोल्हापूरहून मध्यरात्री पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेणोली स्टेशनजवळ लुटालूट झाली आहे. सातारा व सांगली जिल्हा सीमेवर काही अंतरावर मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सिग्नलशी संशयितांनी छेडछाड करत हा सिग्नल बंद पाडला होता. सिग्नल बंद असल्याने रेल्वे थांबल्याचे पाहून संशयितांनी रेल्वे डब्यात शिरुन प्रवाशांचे सोने व मोबाईल लंपास केले आहेत. काही प्रवाशांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र हत्यारांचा धाक दाखवत लूट करण्यात आली.
या घटनेची माहिती समजताच मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तत्पूर्वी चोरट्यांनी पलायन केले. पोलीसांनी चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर सह्याद्री एक्स्प्रेस विलंबाने पुण्याच्या दिशेने रवाना झाली.
