कोल्हापूर : एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचे ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राधानगरी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), रणजीत संभाजी मुधोळकर (रा. सोळांकूर), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही महाविद्यालयात बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. सेमिस्टर ओळखपत्र तयार करण्यासाठी तिने संशयित आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) यांच्याकडे स्वतःचा फोटो पाठविला होता. त्यानंतर ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तिला मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतले. नंतर तिला मुरगूड परिसरातील एका निर्जनस्थळी नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्या फोटोचा गैरवापर करण्याची धमकी देत दबाव टाकण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यानंतर संशयिताने तसेच इतर संशयितांनी पीडितेला मुरगूड परिसरातील तलावाजवळील झाडी, गिरगाव (ता. करवीर) येथील लॉज, टॉप हिल लॉज, पाचगाव,कात्यायणी (ता. करवीर) येथील लॉज,अशोकराज लॉज, पाचगाव आदी विविध ठिकाणांवरील लॉजमध्ये नेऊन तिचे अश्लील चित्रीकरण केले. तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या चित्रीकरणाचा आधार घेत तिला इतर संशयितांशी संपर्क ठेवण्यास भाग पाडण्यात आले. रणजीत संभाजी मुधोळकर (रा. सोळांकूर), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे) यांनीही वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, प्रकरण मिटवून देण्याचे आमिष दाखवत तसेच फोटो-व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन देत पीडितेचे मानसिक व शारीरिक शोषण करण्यात आले. प्रकरण मिटविण्यासाठी काही संशयितांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून या गुन्ह्याची व्याप्ती आणखी मोठी आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. संशयितांच्या संपर्कात आणखी कोणी तरुणी होत्या का, अशाच स्वरूपाच्या इतर घटना घडल्या आहेत का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. संशयितांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाऊंट्स आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी करण्यात येत आहे.

या प्रकरणी बीएनएस कलम ७४, ७५, ६४(१), ६४(२)(एम), ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील पुढील तपास करीत आहेत.