कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धो धो पाऊस पडत आहे पावसाचा वेग असाच राहिला तर नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. संभाव्य पूर व नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव मंडळामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) टीम-५ ई तर्फे समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षण कार्यक्रम शनिवारी राबवण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील धरणांच्या व नद्यांच्या पाणी पातळी वाढ होत आहे. गेल्या २४ तासात आणखी पंधरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत . वीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तूर्त पुराच्या धोका जाणवत नाही तथापि पाणी पातळी वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ),दाखल झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे..
आज पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ग्रामस्थांना पूर, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी, स्वतःची व इतरांची सुरक्षितता तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गावातील इच्छुक युवकांना बोट हाताळणी, लाईफ जॅकेटचा योग्य वापर, बचावकार्याची प्राथमिक तंत्रे तसेच आपत्तीच्या काळात स्थानिक पातळीवर प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. आपत्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक स्वयंसेवक सक्षमपणे मदत करू शकतील, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमास दलाचे कमांडर इन्स्पेक्टर महेश शिंदे, इन्स्पेक्टर अजय यादव यांच्यासह संपूर्ण पथक उपस्थित होते. तसेच मंडळ अधिकारी नलिनी मोहिते, मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उपयुक्त दल
एनडीआरएफ ही भारत सरकारची विशेष आपत्कालीन बचाव संस्था आहे, जी देशात व परदेशात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी बचाव, मदत आणि पुनर्वसनाचे कार्य करत. याची स्थापना २००६ मध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५’ अंतर्गत करण्यात आली आहे.आपत्कालीन परिस्थितीतून मानवी जीवनाचे रक्षण करणे आणि “आपदा सेवा सदैव सर्वत्र” या ब्रीदवाक्याचे पालन करणे हे मुख्य काम आहे.सध्या एनडीआरएफमध्ये १६ बटालियन आहेत。 यात सुमारे १३,००० कर्मचारी कार्यरत आहेत, जे सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल इत्यादी निमलष्करी दलांमधून प्रतिनियुक्तीवर घेतले जातात.
या पथकाजवळ रबर बोटी, लाईफ जॅकेट आणि पूर बचावण्यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत.पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यास प्रयाग चिखली, वडणगे, शिरोळचा काही भाग आणि कोल्हापुरातील सुतार वाडा या परिसरांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
