कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने गती कायम ठेवली आहे. संततदार पावसामुळे जिल्ह्यातील गेल्या २४ तासात पाण्याखाली बंधाऱ्यांच्या संकेत १५ने वाढ होऊन ती आता २० बंधारे झाली आहे. तर चंदगड तालुक्यातील घटप्रभा हे लघु धरण पूर्ण भरले आहे. गेल्या चार दिवसांपासून हलक्या स्वरूपात कोसळणाऱ्या पावसाने काल शुक्रवार पासून जोर पकडला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आज दिवसभर पाऊस पडत राहिला.शहरात जागोजागी पाणी साचल्याने वाहन चालकांना पाण्यातूनच वाहने हाकावी लागली. पाण्याचा निचरा न झाल्याने गटारी तुंबल्या आहेत. सोमवारपर्यंत अशाच सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
धरणे भरू लागली
दरम्यान पावसाचा मुक्काम कायम राहिल्याने घटप्रभा हे लघु धरण पूर्ण भरले आहे. तर जांभरे धरण ५० टक्के भरले असून जगदमहट्टी धरण ३५ टक्के भरले आहे. पावसाची गती कायम राहिल्याने शेती कामाला वेग आला आहे. पश्चिमेकडील भागात भातरोपण लावून गतीने होत आहे.
झाड कोसळले वाहनांचे नुकसान
कोल्हापुरातील राजारामपुरी या व्यापारी पेठेत एक जुने मोठे झाड दुपारी कोसळले. त्यामुळे दुकानासमोर लावलेल्या काही वाहनांचे नुकसान झाले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या फांद्या दूर करून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
पाऊस वाढण्याची चिन्हे
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीची पातळी सध्या २२ फुटांवर पोहोचली आहे. अवघ्या २४ तासांत पंचगंगा नदीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे.
धबधबा आकर्षण
जिल्ह्यातील प्रमुख राऊतवाडीचा धबधबा सुरू झाला आहे. राधानगरी तालुक्यातील हा धबधबा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पावसाचे आगार समजले जाणाऱ्या राधानगरी मधला हा धबधबा ५० फुटावरून कोसळतो. त्याचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे असते. सध्या पावसाचा जोर वाढला असून हा धबधबा आता प्रवाहित झाला आहे. या धबधब्याचे तुषार अंगावर झेलत वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल होतात. आता पर्यटकांची पावलं वळत आहेत.
