कोल्हापूर : कोल्हापूर शहराला गुरुवारी पावसाने झोडपून काढल्यानंतर पंचगंगा नदीला पूर आला नसला तरी प्लास्टिकचा पूर आल्याचे चित्र आज नदीपात्रात दिसून आले. नदीत सुमारे ३ एकरावर क्षेत्रात कचऱ्याचा थर साचला होता. येथे १०० टनहून अधिक कचरा असल्याचा अंदाज आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अर्धवट नालेसफाईमुळे ही दुर्दशा ओढवली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.कोल्हापूर शहर व परिसरात काल सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. शहरात नाले, गटारे भरभरून वाहत होते. यातूनच विविध प्रकारचा कचरा वाहून गेला. त्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक होते.
हा कचरा पंचगंगा नदीतून वाहत राहिला. तो राजाराम बंधारा येथे अडकला आणि पुढे जाण्याचा मार्ग खुंटल्याने तो तेथेच साचून राहिला. याबाबतची छायाचित्रे आणि चित्रफिती आज समाज माध्यमात अग्रेषित झाल्यावर त्याचीच आज सर्वोतमुखी चर्चा सुरू राहिली. या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारक, नागरिकांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला,
यंत्रणा लागली कामाला
महापालिकेने या प्रकाराची आज दखल घेतली. एक जेसीबी, एक डंपर, तीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सुमारे ५० टनाहून अधिक कचरा नदीपात्रातून काढल्याचा दावा प्रशासनाने केला.
महापालिकेवर तोंडसुख
दरम्यान या प्रकारावर आज उलट सुलट चर्चा रंगली होती. हा कचरा म्हणजे नागरिकांच्या बेशिस्त वागणुकीची शिक्षा असल्याचा सूर समाज माध्यमातून व्यक्त करण्यात आला. तर काहींनी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनावर टीका केली. याबाबत पंचगंगा नदी प्रदूषण उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते दिलीप देसाई यांनी कोल्हापूर महानगरपालिकेने नालेसफाई काही प्रमाणात केली.पण, नाल्यातील काही गाळ कडेलाच राहिला. तो महानगरपालिकेने उचला नसल्यामुळे कालच्या पावसाने हाच कचरा पुन्हा नाल्याद्वारे पंचगंगा नदीत मिसळून बंधाऱ्यात अडकला. यातून कोल्हापूरातील कचरा उठाव होत नाही हे दिसून आले आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे.