कोल्हापूर : लोककल्याणकारी, समतावादी आणि रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी ६ मे रोजी असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बायसन नेचर क्लबतर्फे शाहूस्पर्श भ्रमंती या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. इतिहास, निसर्ग आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाने सहभागींच्या मनावर ठसा उमटवला.

राधानगरी–दाजीपूर परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विविध स्थळांना भेट घडवणाऱ्या या भ्रमंती मधून शाहू महाराजांनी स्थापन केलेले भवानी अंबाबाई मंदिर, भव्य हत्तीमहाल, निसर्गरम्य लक्ष्मी तलाव, राजर्षी शाहू स्मारक यांचा समावेश होता.

यावेळी दाजीपूर–राधानगरी जंगल परिसरातील राजर्षी शाहू महाराजांचा जुना शिकारी मार्ग देखील सहभागीांना दाखवण्यात आला. या मार्गांद्वारे त्या काळातील जंगल व्यवस्थापन, वनसंपत्ती आणि महाराजांची दूरदृष्टी यांची ओळख करून देण्यात आल्याने उपस्थितांना इतिहासाचा जिवंत अनुभव मिळाला.

चुनाभट्टी येथे त्या काळात वापरले जाणारे चुना तयार करण्याचे पारंपरिक यंत्रही दाखवण्यात आले. या माध्यमातून त्या काळातील औद्योगिक प्रगती आणि स्थानिक उत्पादन व्यवस्थेची माहिती सहभागींपर्यंत पोहोचली. स्थळांची सविस्तर, रंजक माहिती इतिहास अभ्यासक रुपेश बोंबाडे यांनी दिली. कोल्हापूर हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सम्राट केरकर, संदेश म्हापसेकर, विष्णू कासार यांच्यासह अनेक शालेय विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते. 

शाहूंचे ऐतिहासिक योगदान

राधानगरी धरण हे राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि लोककल्याणकारी कार्याचे महान प्रतीक आहे. १९०८ मध्ये पायाभरणी झालेल्या या धरणाने कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार केले. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या मदतीने उभारलेले हे धरण, स्वयंचलित दरवाजे आणि पाणी सिंचनासाठी १०० वर्षांनंतरही उपयोगी ठरत आहे.

शाहू महाराजांनी स्वतःच्या आईच्या (राधाबाई) नावावरून या परिसराला ‘राधानगरी’ नाव दिले. धरणामध्ये विश्वेश्वरय्या यांनी डिझाइन केलेले स्वयंचलित दरवाजे आहेत, जे आजही कार्यरत आहेत. हे धरण पाणी सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. धरणाच्या कामावर देखरेख करण्यासाठी महाराजांनी ‘बेनझीर व्हिला’ नावाने निवासस्थान बांधले होते.

बेनझीरचा अर्थ एकमेवाद्वितीय किंवा अप्रतिम असा होतो. हे नाव दस्तुरखुद्द राधानगरी धरणाचं स्वप्न पाहणाऱ्या शाहू महाराजांनीच दिले आहे. या व्हिलाची प्रत्येक भिंत महाराजांचा रयतेच्या कल्याणासाठी जो दृढनिश्चय होता त्याची ती साक्षीदार आहे. चुना आणि वाळूमध्ये बांधलेली ही आकर्षक व ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे. राधानगरी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाण आहे.

दाजीपूर वन्यजीव अभयारण्य येथून जवळ आहे. राधानगरी हे गाव भोगावती नदी वरती वसले आहे. भोगावती नदी वरती शाहू महाराजांनी लक्ष्मी नावाचे सात टी.एम.सी.चे धरण बांधले की जे भारतातील एकमेव धरण आहे ज्याला, ७ स्वयंचलित दरवाजे आहेत. धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यास आपोआप स्वयंचलित दरवाजे उचलले जातात व ज्यादाचे पाणी सांडव्यावरून निघून जाते त्यामुळे धरणाला काही धोका पोहचत नाही