कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्र राज्यात अमली पदार्थांचा उच्छाद मांडला आहे. यात गुंतलेल्या टोळीला नेस्तनाबूत करून महाराष्ट्र उडता पंजाब होण्यापासून वाचवावे, अशी आर्त हाक शनिवारी घातली आहे. याबाबत संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, आज देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. दोन दिवस त्यांचे कार्यकर्ता मार्गदर्शनापासून ते पक्षवाढीसाठीचे विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कोल्हापूर पदार्थाचे हब

अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकलेला महाराष्ट्र आता उडता पंजाब झालेला आहे, हे जळजळीत वास्तव समोर आहे. ज्या कोल्हापूर जिल्ह्यात ते आज दोन कार्यक्रम घेणार आहेत ते कोल्हापूर शहर व इचलकरंजी शहर हे अमली पदार्थाचे हब म्हणून ओळखले जावू लागले आहे.

लाखो तरुण जाळ्यात

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मिळून जवळपास दिड लाखाहून अधिक तरूण अमली पदार्थाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात दिवसेदिवस ही संख्या वाढत असून पोलिसासमोर हे आवाहन निर्माण झालेले आहे. एकीकडे नक्षलवाद संपविला म्हणून डांगोरा पिटविणारे आज अमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी हतबल झालेले दिसत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

क्राईम रेट वाढला

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात सर्रास अमली पदार्थ विकले जावू लागले आहे. यामध्ये प्रामुख्याने गांजा, भांग, चरस, हेरॅाईन , ब्राऊन शुगर , मेथाम्फेटामाइन ,अफू आणि कोकेन यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे कोल्हापूर सारख्या पुरोगामी व शांतताप्रिय जिल्ह्यात क्राईम रेट वाढला आहे. अमली पदार्थांच्या सेवनातून दररोज खून ,टोळीयुध्द, चोरी , दरोडा , मारामारी यासारखे प्रकार घडत असून पोलिस यासमोर हतबल झाले आहेत.

लाखोचे दरमहा हप्ते

शाळा , कॅालेज , औद्योगीक वसाहती याठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकले जात आहेत. विक्री होणारी सर्व ठिकाणे पोलिस खात्यातील लोकांना माहित आहेत. मात्र या सर्वांना लाखो रूपयाचे दरमहा हप्ते सुरू असल्याने यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस अधिकारी करीत नाहीत. एखाद्या पेडलर वरती कारवाई करून त्याला सोडून दिले जाते मात्र त्याचे समूळ उच्चाटन केले जात नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

फडणवीस अपयशी गृहमंत्री

देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज शाहूनगरीत व वस्त्रनगरीत मांडीला मांडी लावून बसणार आहेत. अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी झाले आहेत. किंबहुना त्यांना या गोष्टीस पाठीशी घालायचे असल्याने ते दुर्लक्ष करीत आहेत. मटका , जुगार व अवैद्य दारूविक्री ही पोलिसांच्या कमाईचे साधन झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबई, पुणे , नागपूर , अमरावती , छत्रपती संभाजीनगर , नवी मुंबई , ठाणे , कल्याण , भिवंडी , जळगांव , अकोला , सोलापूर , नाशिक , अहिल्यानगर , रत्नागिरी ही शहरे पुर्णत: अमली पदार्थाच्या विळख्यात सापडली आहेत.

नशामुक्त महाराष्ट्र

शाळा व कॅालेजमधील देशाचे भविष्य घडविणारी पिढी बरबाद होत असताना स्वत:ला पोलादी पुरूष समजणारे देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा या प्रकरणी लक्ष घालून अमली पदार्थात अव्वल स्थानी असलेल्या राज्याला नशामुक्त करण्याची घोषणा करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.