कोल्हापूर : बरोबर याच दिवशी ५८ पूर्वी कोल्हापूरकरांच्या पोटात गोळा आणणारी एक भीतीदायक घटना घडली होती. कोयना भूकंपाचे पडसाद कोल्हापुरात उमटले. आणि कोल्हापूर भीतीने गर्भगळीत झाले होते. काय घडले होते कोयना धरण आणि कोल्हापुरात?

धरणाचा भूकंप ११ डिसेंबर १९६७ रोजी झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी झाली होती. त्यात किमान १७७ जणांचा मृत्यू झाला आणि २,२०० हून अधिक जण जखमी झाले होते. १९६७ पासून तेथे कमी तीव्रतेचे अनेक भूकंप झाले आहेत. भूकंपामुळे जमिनीत १०-१५ सेमी (३.९-५.९ इंच) भेगा पडल्या, ज्या २५ किलोमीटर (१६ मैल) लांबीपर्यंत पसरल्या होत्या. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर होता, तर नाभी १५ किलोमीटर खोल होती.

महाराष्ट्रात फार मोठ्या क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता रिश्टर श्रेणीनुसार ६.६ इतकी प्रचंड होती. या भूकंपामुळे जवळपास २५ किलोमीटर अंतराच्या पट्ट्यात जमिनीला रुंद भेगा पडल्या होत्या. धरणाच्या बांधकामालाही तडे गेले होते. धरणाच्या पश्चिमेला काही अंतरावर असणाऱ्या डोंगराळ भागात भूकंपामुळे एका ठिकाणी कडा तुटला होता. भारतीय द्वीपकल्पातल्या या भागात एवढ्या मोठ्या तीव्रतेचा आणि इतका विनाशकारी भूकंप होणे अपेक्षित नसल्याने या भूकंपाने भूवैज्ञानिकांना संभ्रमात टाकले.

कोयना धरणाच्या या विनाशकारी भूकंपाचे पडसाद कोल्हापुरात ही म्हटले होते याचा अनुभव करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उदय कुलकर्णी यांनी सांगितले की, या दिवशी भल्या पहाटे झोपेतून जाग आली ती हादरणाऱ्या जमिनीमुळे. भारत चीन युद्धाच्या वेळी विमान हल्ल्याच्या भीतीने ब्लॅक आऊटचा अनुभव घेतला होता. ११ डिसेंबरला पहाटे हादरणाऱ्या जमिनी बरोबर वीजही गायब झाली होती. सगळीकडे अंधार! वाटलं युध्द सुरु होऊन रणगाडे घरापर्यंत आले बहुतेक! वय वर्षे अकरा असताना दुसरं काय सुचणार, कारण पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाची शक्यता नाही असंच शाळेत शिकविले जात होते.

अन कोल्हापूरकर रस्त्यावर आले!

धडपडत घराबाहेर पडलो तर सगळेच रस्त्यावर आले होते. कोल्हापुरात कोणालाच नेमके काय झाले हे कळत नव्हते. अनेकांच्या घरी रेडिओ होते, पण वीज नसल्याने त्यांचा उपयोग नव्हता. अखेर ट्रान्झिस्टरवरील बातम्या ऐकल्यावर सकाळी सहा नंतर काय झाले याचा अंदाज आला. भीती इतकी मनात होती की पुढचे काही दिवस लोक रस्त्यावर, मैदानांमध्ये व रंकाळा तलावाच्या काठावर झोपायला जात. काही शाळांमध्ये भूकंप होताच बाके व टेबलांखाली लढण्याची प्रात्यक्षिके ही करुन घेण्यात आली होती.

आता संपूर्ण सह्याद्रीच तथाकथित विकासकामे व खाणकामांनी खिळखिळा झाला आहे. पुन्हा मोठा भूकंप झालाच तर? आपले काय नियोजन आहे?, असा प्रश्न या निमित्ताने पर्यावरण कार्यकर्ते उदय कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.