कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी परतीच्या पावसाने झोडपले. पहाटे आणि सायंकाळी तासभर पडलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.
अनंत चतुर्दशी नंतर अति उकाड्याने लोक हैराण झाले होते. या पावसाने नागरिकांना काहीसा गारवा लाभला. दुपारच्या सुमारास रिमझिम बरसण्यास सुरुवात केलेल्या पावसाने पाचनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊणतास पावसाने झोडपून काढले.

वाहतूक कोंडी

पुणे – बंगळूर महामार्गावर शिरोली , सांगली फाटा येथे प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाने अनेक भागात रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती.इचलकरंजी शहर व परिसरात पहाटेपासून पावसाने चांगली हजेरी लावली.

पिकांना फटका,दिलासा

कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज भासत होती. आजच्या पावसाच्या आगमनाने शेतकरी काहीसा सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या व मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, धो-धो कोसळणारा पाऊस यामुळे ऊसासह भातपीके जमिनदोस्त झाली. तर काही ठिकाणी या पावसामुळे भात, भुईमूग आणि सोयाबीन यांसारख्या पिकांना किंचित दिलासा मिळाला आहे. शेतीसाठी पावसाची आणखी आवश्यकता आहे. वाळत चाललेली पिके कितपत उभारी घेतात याबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे.

कायद्याचे पालन -पोलीस अधीक्षक

गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी पोलिसांनी कोठेही बळजबरी केलेली नाही. एका मंडळातील कार्यकर्त्यात हाणामारी सुरू असताना चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी सौम्य लाठीमार केला. हा प्रकार वगळता जिल्ह्यात पोलिसांनी कोठेही बळजबरी केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ध्वनीयंत्रणा रात्री बारा वाजता बंद करण्यात आली. कायद्यानुसार पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त केला असल्याने गणेश विसर्जन मिरवणूक जिल्ह्यात शांततेने पार पडली, असे पोलीस अधीक्षक निलोत्पलयांनी सांगितले.