कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनो मध्ये जुगार खेळत असल्याची चित्रफित जारी करत उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले यांनी नगरसेवकांनी कॅसिनो मध्ये जाऊन जुगार खेळणे योग्य आहे, का असा प्रश्न करीत नगरसेवक पुत्राच्या या कृत्याप्रकरणी राजेश क्षीरसागर यांनी नैतिकतेच्या आधारे आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
तर रविकिरण इंगवले हे सातत्याने क्षीरसागर कुटुंबावर आरोप करीत आले आहेत. त्यांच्या या आरोपाला महत्त्व देत नाही. तथापि, त्यांनी जारी केलेली चित्रफित व आरोप याबाबत कायदे तज्ञांशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे प्रत्युत्तर नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी दिले. या निमित्ताने पुन्हा एकदा आमदार राजेश क्षीरसागर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख इंगवले यांनी पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर व त्यांचे नगरसेवक पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांना लक्ष्य केले आहे. रविकिरण इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेत एक चित्रफित जारी केली. त्यामध्ये एका कॅसिनोमध्ये नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर हे जुगार खेळत आहेत असे इंगवले यांचे म्हणणे आहे.
या चित्रफितीच्या आधारेच इंगवले यांनी क्षीरसागर पितापुत्रांवर आज अनेक आरोप केले. इंगवले म्हणाले, कोल्हापूर शहरांमध्ये जुगार, गांजा, कॅसिनो याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये तरुण पिढी बरबाद होत आहे. तर दुसरीकडे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर हे खुलेआम कॅसिनो मध्ये जुगार खेळत आहेत. अशा प्रकारे त्यांनी कॅसिनो मध्ये जाऊन जुगार खेळणे योग्य का, असा प्रश्न इंगवले यांनी उपस्थित केला.
आमदार आणि नगरसेवक पुत्र अशी कृत्य करत असतील तर नागरिकांनी त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. क्षीरसागर पितापुत्र बदनाम होते. ते आता या प्रकरणामुळे आणखी बदनाम झाले आहेत. या प्रकाराची नैतिकता दाखवून आमदार राजेश क्षीरसागर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कायदेशीर कारवाई करणार
दरम्यान, रविकिरण इंगवले यांनी केलेल्या आरोपावर बोलताना नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी पत्रकारांना सांगितले की, रविकिरण इंगवले हे सन २०२२ पासून क्षीरसागर कुटुंबावर सातत्याने आरोप करीत आले आहेत. मध्यंतरी त्यांनी पेन ड्राइवच्या माध्यमातून काही आरोप करण्याचा प्रयत्न केला होता कोल्हापूर महापालिका निवडणुकीत माझी उमेदवारी असताना चुकीचे पत्रके वाटून प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केलेला होता. इंगवले यांनी सादर केलेले फोटो मी पाहिले आहेत. त्यांनी जी चित्रफीत सादर केली आहे ते अभ्यासली जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे (एआय) ती कितपत वैध आहे हे पाहिले जाईल. इंगवले यांनी केलेल्या बदनामी बाबत कायदे तज्ञांशी सल्ला घेऊन कारवाई करणार असल्याचे ऋतुराज इंगवले यांनी स्पष्टपणे सांगितले.
