कोल्हापूर : पहिल्याच पावसाने कोल्हापुरातील नालेसफाईचे वास्तव उघड्यावर पडले आहे. शहरात अनेक भागांत – रस्त्यांवर कचरा, चिखल साचला आहे. वरून पाऊस आणि खाली सफाईचे काम सुरू असे विसंगत चित्र शहरात पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहराला दर वर्षी पुराचा फटका बसत असतो. त्यामुळे नालेसफाईचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्णपणे होणे अपेक्षित असते. शहराला गेले चार दिवस पावसाने झोडपून काढले आहे. शहर परिसरातील बारा नाल्यांमधून पाणी वाहू लागले. पंचगंगा नदी ऐन पावसाळ्यात प्रदूषित झाली आहे.

शहराच्या अनेक भागांमध्ये कचरा दिसून येत आहे. बेशिस्त विकास कामाचा फटका बसत आहे. नळपाणी योजना, मलनिस्सारण योजना, गॅस लाइन अशा विविध कामांसाठी रस्ते खोदले गेले आहेत. ही कामे अपूर्ण असल्याने मातीमुळे अनेक भागांत – रस्त्यांवर चिखल साचला आहे. त्यामुळे भंडावून गेलेल्या पादचारी, वाहनधारकांकडून कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या कोल्हापूर शहरात वरून पावसाच्या धारा आणि खाली नालेसफाई, कचरा सफाई कचरा उठाव असे भलते चित्र दिसत आहे. महापालिका प्रशासनाला पूरकाळाचे गांभीर्य नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. पावसाचा मुक्काम कायम कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप सुरू होती. गेल्या चार दिवसांच्या तुलनेने पावसाचे प्रमाण कमी होते. अधूनमधून पावसाची हजेरी लागत होती.