कोल्हापूर : सध्या साखरेचे दर वाढलेले आहेत. या वाढलेल्या दरातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगाम सन २०२५-२६ मध्ये तुटलेल्या ऊसाचे बिल शिल्लक असलेल्या साखरेतून मिळणाऱ्या नफ्यातून देण्यासाठी कोल्हापूर, सांगली विभागातील सर्व साखर कारखान्यांना आदेश काढावेत, अशी विविध शेतकरी संघटनांनी प्रादेशिक सह. संचालक साखर संगीता डोंगरे, साखर कारखाने यांच्याकडे मागणी केली आहे.मागील हंगामामध्ये साखर सरासरी ४० रुपये दराने विक्री झालेली आहे. सध्या आमचे माहितीनुसार साखर कारखान्यांकडे २० टक्के साखर शिल्लक आहे. मागील काही दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे.

रक्कम कशी देऊ शकतात?

ही दरवाढ सरासरी १५ रुपयांपर्यंत झालेली आहे. उदा. ५ लाख टन ऊस गाळप केलेल्या कारखान्यांकडे १२.५० उतारा प्रमाणे ६५.५०० टन साखर उत्पादन झालेले आहे. यातील २० टेक शिल्लक प्रमाणे १२.५०० टन साखरेचे वाढीव १५००० रुपये टनाप्रमाणे १८ कोटी ७५ लाख रु. जादा उत्पन्न मिळणार आहे.

मुख्य मागणी कोणती?

एकूण गाळप ५ लाख टनास वाढीव उत्पन्नातीलप्रती टन ऊसासाठी ३७५ रुपये दुसरा हप्ता कारखान्यांनी ऊस उत्पादकांना देणे लागत आहे. या शिल्लक साखरेसाठी दुसरा कोणताही खर्च करावा लागत नाही. आपल्या विभागातील बऱ्याच कारखान्यांनी मागील हंगामातील घोषित केलेल्या पहिल्या हप्त्यातील रक्कम देणे लागत आहे. ती रक्कम प्रती टन साधारण १५० रुपयांच्या आसपास आहे. यामध्ये वरील हिशोबाप्रमाणे वाढीव नफा ३७५ अधिक १५० धरून किमान ५२५ रुपये दुसरा हप्ता ऊस उत्पादकांना देण्यासाठी आदेश काढावेत , अशी मागणी साखर सह संचालक यांच्याकडे संघटनेने केली आहे.

उत्पादन खर्चात वाढ

वाढीव उत्पादन खर्चामुळे सध्या ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या रासायनिक खतांचे दर ९० टक्के वाढलेले आहेत. मशागत व मजुरी यांचे दरही ३० ते ४० टक्क्यांनी वाढलेले आहेत. तणनाशके-कीटकनाशके यांचे दर १०७ टक्केनी वाढलेले आहेत. मागील ७ ते ८ हंगामातील तोडणी-वाहतूक खर्च ६५ टक्क्यांनी वाढलेले आहेत. या सर्वाचा हिशोब करता ऊस उत्पादन खर्च सरासरी १०० टक्केनी वाढलेला आहे. त्यामुळे वाढलेल्या साखर विक्रीतून मिळणारा सर्व नफा ऊस उत्पादकांना मिळाला पाहिजे.

आंदोलनाचा इशारा

याशिवाय इतर उपपदार्थातून कारखान्यांना उत्पन्न मिळाले आहे. आपल्याकडे सर्व साखर कारखान्यांचा हिशोब आलेला आहे. तरी आपण आमच्या मागणीप्रमाणे मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता ५२५ रुपये प्रती टनाप्रमाणे देण्यासाठी आदेश काढावेत. १५ सप्टेंबर पर्यंत दुसरा हप्ता न मिळाल्यास कार्यालासमोर आंदोलन करणार आहोत याची गंभीर दखल घ्यावी, असा इशारा जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्यासह शेतकरी नेते सावकार मादनाईक,वैभव कांबळे (अध्यक्ष, शेतकरी-शेतमजूर संघटना), रुपेश पाटील अध्यक्ष, स्वाभिमानी संभाजी बिग्रेड), जनार्दन पाटील (सचिव, शेतकरी सेना महाराष्ट्र), भगवान काटे (सचिव, किसान मोर्चा ),अमोल नाईक (किसान सभा ), संदीप देसाई (आप),, ज्ञानदेव पाटील (अध्यक्ष, शेतकरी संघटना ), माणिकराव पाटील ( अध्यक्ष, पदवीधर संघटना ),बाबासो देवकर ( सचिव, शेकाप), संभाजीराव चौगले, सदशिव कुलकर्णी , गब्बर पाटील नानासो इंगळे, शिवाजी आंबेकर, रमेश गायकवाड, शैलेश आडके, ज्योतीराम घोडके, बाळासाहेब पाटील, संदीप पुजारी, कृष्णात मोगणे, रंगराव पाटील, शितल कुमार चौगुले, मारुती मोळे, नागनाथ बेणके, धनराज आमते, रावसो डोंगळे, साताप्पा पाटील, उत्तम पाटील, विलास पाटील, निवास सरनाईक, प्रकाश मगदूम, वकील मादनाईक, आप्पासो साखळे, दानलिंग दणाने, विलास पाटील, शामराव टिपुगडे आदींनी केली आहे.