कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध करीत सोमवारी महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमीन मोजणी नोटिसांची होळी करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी केली.जमिनीची मोजणी नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांची आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याबाबत लवकरच अधिकाऱ्यांसोबत समितीची बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जमीन मोजणी होणार असल्याची नोटिस शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यासाठी आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी करवीर तालुक्यातील जमीन मोजणीच्या नोटिसांची होळी केली.
त्यानंतर शिष्टमंडळ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना भेटले. हरकतींची सुनावणीच झाली नसताना व शेतकऱ्यांचा महामार्ग करण्यास विरोध असताना ई चावडी या पोर्टलवर मोजणींच्या तारखा जाहीर कशा होतात असा प्रश्न शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी विचारला. यावर जिल्हाधिकारी राठोड म्हणाले की, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्पष्टीकरण देऊ शकेल.
एवढ्यावरच शिष्टमंडळाचे समाधान झाले नसल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले. आमच्या जमीन मोजणी बद्दल बोला शेतकऱ्यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तोंडी आश्वासन देत सांगितले की आपल्या जमिनीची मोजणी होणार नाही. यावर करवीर तालुक्यातील प्रांताधिकारी, भूमिलेख अधिकारी यांची व समितीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक चार दिवसात घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले.
दरम्यान जमीन मोजणी नोटीसचीची होळी करत आंदोलनासमोर बोलताना समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले,शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढून आंदोलने करून विरोध सुरू असताना शिवाय अधिसूचनेवरती हरकती शेतकऱ्यांनी दाखल केले असताना जमीन मोजणीच्या नोटिसा काढणे हे हुकूमशाहीचे लक्षण आहे. संविधानाने दिलेला संपत्ती हा मूलभूत अधिकाराचा वापर करत आपल्या जमिनीचे रक्षण करण्याचा शेतकऱ्यांना पूर्ण अधिकार आहे आणि तो आम्ही गावागावात बजावणार. जमीन मोजणी नोटीस जाहीर करणे हा फडणवीस आणि खडा टाकून चाचपणी केल्याचा प्रकार आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे सेनेचे सह संपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले,” शक्तिपीठ महामार्गाला सर्वपक्षीय कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी विरोध करत आहेत. हा महामार्ग कंत्राटदारांच्या भल्यासाठी आहे. कंत्राटदारांसाठी शेतकऱ्यांचा बळी येऊ देणार नाही. बाबासाहेब देवकर म्हणाले,” करवीर तालुक्यातील काळमादेवी मंदिर देखील या महामार्गाच्या रेखांकनामध्ये नष्ट होणार आहे. या महामार्गामुळे महापूर येणार आहे. समाजातील सर्व घटक महाप्रामुळे प्रभावित होणार.
याबरोबरच जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, कॅप्टन उत्तम पाटील, सम्राट मोरे, ज्ञानदेव यादव यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
आंदोलनामध्ये विक्रांत पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात पाटील, दीपक जाधव, शिवाजी कांबळे, अनिल कोळी, युवराज देसाई, दयानंद सूर्यवंशी, भगवान पाटील, दिलीप पाटील, मुकुंद पाटील, किशोर पाटील, बजरंग रणदिवे, युवराज गवळी , मधुकर चव्हाण, जे. एन. पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
