कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गाविरोधात आवाज बुलंद झाला. हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी १२ जिल्ह्यातून आलेले शेतकरी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक भर उन्हात रस्तावर उतरले होते.
पश्चिम महाराष्ट्रात आधीच गंभीर स्वरूप धारण केलेल्या महापुराची तीव्रता वाढवणारा, पर्यावरणाचा र्हास करणारा, शेतकरी विरोधी, भ्रष्टाचारी असा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चाचे आयोजन केले होते.
दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील, शेकापचे संपतबापू पवार -पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे, राजीव आवळे, ए. वाय. पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शिवसेना उप नेते संजय पवार, कॉम्रेड उदय नारकर , शक्तिपीठ महामार्ग विरोधी समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांच्यासह बाधित शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांचा संताप
नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्गा’विरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश शिगेला पोहोचला असल्याचे दिसून आले. या महामार्गासाठी होणाऱ्या सुपीक जमिनीच्या संपादनाला विरोध करण्यासाठी आज शहरात निर्णायक मोर्चा काढण्यात आला.
शेतकरी संघर्ष समिती आणि विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
प्रकल्पाविरोधात संताप
यावेळी अनेकांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला. त्यांनी सांगितले की,कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जमीन ही प्रचंड सुपीक आणि बारमाही बागायती आहे. या महामार्गामुळे हजारो एकर शेतजमीन कायमची नष्ट होईल, ज्यामुळे शेतकरी भूमिहीन आणि उद्ध्वस्त होईल.
महामार्गात जाणारी बहुतांश जमीन ही ऊस, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांची आहे. कोल्हापुरात बहुतांश शेतकऱ्यांकडे १ ते २ एकरच जमीन आहे. तीही महामार्गात गेली, तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होणार असून वन्यजीवांच्या अधिवासाला धक्का पोहोचणार असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या महामार्गांचे रुंदीकरण करण्याऐवजी नवीन महामार्ग कशासाठी? असा सवाल शेतकरी विचारत होते.
पोलिसांची नोटीस
मंगळवारी निघणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या मोर्चाबाबत संयोजकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांची चर्चा केल्यानंतर पुढील गोष्टी ठरल्या आहेत. आंदोलक शेतकरी दसरा चौक मध्ये जमतील. खानविलकर पेट्रोल पंप या ठिकाणी १०० फुटी रोड व जिल्हाधिकारी कार्यालयामागील एस्टर पॅटर्न ग्राउंड वरती सोय केली आहे. दसरा चौक मधून व्हीनस कॉर्नर व बसंत बहार रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा गेल्यावर तेथे सभेत रूपांतर झाले. २५ लोकांचे शिष्टमंडळ गेले.
