कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ ( सुटा) अंतर्गत वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. सुटांतर्गत दोन्ही संघटनातील वाद चिघळत चालला आहे. सुटा मध्ये सत्तेवर असलेल्यांनी बेकायदेशीर कामे केले असून त्याची चौकशी करावी, या मागणीसाठी रविवारी सुटा संघर्ष समितीच्या वतीने शिवाजी विद्यापीठा समोर धरणे आंदोलन करण्यात आले. सुटा अंतर्गत मध्यंतरी जोरदार मतभेद झाले होते. आता पुन्हा एकदा हा वाद तापताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून आज संघर्ष समितीने धरणे आंदोलन केले.
मागण्या कोणत्या?
सुटा घटनेतील बेकायदेशीर बदल रद्द करावेत, नव्याने केलेली निवडणूक नियमावली बेकायदेशीर असल्याने रद्द करावी, निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात यावी, अध्यक्ष प्रा. आर. के. चव्हाण यांनी केलेल्या अधिकारी बाह्य कारभाराची चौकशी करण्यात यावी, सत्ताधारी व सहाय्यक कामगार आयुक्त यांनी संगणमताने घटनेत केलेले बेकायदेशीर बदल रद्द करण्यात यावेत आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
शेलारमामांचा सहभाग
सुटाच्या स्थापनेत सहभाग घेतलेली ८६ वर्षीय निवृत्त प्रा. एस.बी. तथा बाबा पाटील, डॉ. संतोष जेठीथोर, प्रा. गुंडोपंत पाटील, डॉ. अरुण पाटील, प्रा. पांडुरंग फराकटे, प्रा. युवराज पाटील, प्रा. पी. व्ही. स्वामी आदी सहभागी झाले होते.
संघटनेचा लढा
शिवाजी विद्यापीठातील शिक्षक संघटना असलेल्या सुटा या संघटनेने आणि विविध संघर्ष समित्यांनी वेळोवेळी विविध मागण्यांसाठी लढा दिला आहे. वेळेवर पगार न होणे, ऑनलाइन वेतन प्रणालीतील त्रुटी आणि सहसंचालक कार्यालयातील कारभाराविरुद्ध आंदोलने करण्यात आली आहेत. बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी, प्राध्यापकांचे थकीत प्रस्ताव आणि सेवािनवृत्त प्राध्यापकांच्या पेन्शनचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना न्याय मिळवून देणे आणि शासकीय निर्णयांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
