कोल्हापूर : चांदीच्या दराने दिवसेंदिवस उसळी घेण्यास सुरुवात केल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली असताना अधिक मासात वाण देण्याच्या प्रथेमुळे चांदीच्या बाजारपेठेला पुन्हा काही प्रमाणात झळाळी आली आहे. वाणाच्या दागिन्यांची मागणी लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. याच वेळी वाणाच्या दागिन्यांचे आकारमान निम्म्यापर्यंत घटले आहे. किमान १० ग्रॅम वजनाची जोडवी खरेदी करणाऱ्या महिला भाववाढीमुळे ५ ग्रॅमच्या जोडवी खरेदीला प्राधान्य देत आहेत.

गेले वर्ष-दीड वर्ष सोन्या-चांदीचे दर सातत्याने वधारत आहेत. मध्यंतरी चांदीचा दर प्रतिकिलो चार लाखांवर गेला होता. तो पुन्हा दोन लाखांवर आला. आता तो पावणेतीन लाखांच्या दरम्यान आहे. चांदीच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता दिसत आहे. अलीकडे दराचा आलेख सातत्याने वाढत चालला आहे. याचा परिणाम चांदीविक्री घटण्यामध्ये झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीची ओळख चांदीनगरी अशी आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेल्या या बाजारपेठेत चांदी दरवाढीचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. या नगरी आणि परिसरात सुमारे पाच हजारांहून अधिक चांदी व्यावसायिक असून, सुमारे ३० हजारांवर कारागीर येथे चांदीवर कलाकुसर करीत असतात. सध्या अधिक मास सुरू आहे. या पुरुषोत्तम महिन्यामध्ये जावयास अनारसे, चांदीची ताटे, वाट्या, पेले, निरंजन, समई, नंदादीप स्वरूपातील दीप दान करण्याची परंपरा आहे. तर, महिला जोडवी, वेढणी, पैंजण खरेदी करीत असतात.

दरात तिप्पट वाढ

मागील अधिक मासाच्या वेळी केलेल्या खरेदीच्या किमतीचे स्मरण करीत ग्राहक वाण स्वरूपात चांदीचे अलंकार खरेदी करण्यासाठी येतात. परंतु आताचे दर पाहून त्यांचा खरेदीचा उत्साह मावळतो. हुपरी हे पैंजण बनवण्यासाठी देशात प्रसिद्ध आहे. याच चांदीनगरीत गेल्या अधिक मासावेळी सुमारे पाच हजार रुपयांस मिळणारे पैंजण आता जवळपास तिप्पट म्हणजे १५ हजारांहून अधिक किमतीला मिळत आहे.

वजनात घट, वैविध्यात भर

दरवाढीचा परिणाम चांदीच्या वाण अलंकारांवरही झाला आहे. जावयास चांदीचे ताट, वाट्या, दीप देऊन मानपान केला जात आहे. त्यामुळे अशा अलंकाराची मागणी वाढली असल्याने मध्यंतरी मरगळलेल्या चांदी बाजाराला लकाकी आली आहे. परंतु या अलंकाराचे आकारमान निम्म्याइतके घटले आहे. यापूर्वी महिला किमान दहा ग्रॅमची जोडवी खरेदी करीत असत. परंतु, आता भाववाढीमुळे हेच प्रमाण ५ ग्रॅमवर येऊन ठेपले आहे. चांदीचे हे दागिने कमी वजनाचे घ्यावे लागत असले, तरी त्याच्या वैविध्यामध्ये कमालीची भर पडली आहे. जोडवी आणि त्याच्या जोडीलाच वेढणी हे दोन्ही दागिने कमी वजनाचे मिळत असताना ते पूर्वीपेक्षा अधिक देखणे, नाजूक आणि कलाकुसरयुक्त बनवले गेले आहेत. जोडव्यांचे सुमारे २५-३० हून अधिक प्रकार, तर वेढण्यांच्या प्रकाराने शंभराचा टप्पा ओलांडला आहे.

परराज्यांतूनही मोठी मागणी

अधिक मास हा चांदी व्यावसायिकांच्या दृष्टीने चांगला महिना असतो. मात्र, यंदा चांदीचे दर वाढल्यामुळे पूर्वीसारखे मोठ्या वजनाचे दागिने, वस्तू देण्याऐवजी कमी आकार-वजनाच्या कलाकृती खरेदीवर ग्राहकांचा भर आहे. त्यामुळे परंपरा पाळली जातानाच नव्या प्रकारचे आकर्षक दागिने, वस्तूही मिळत आहेत. या नव्या अलंकारांना महाराष्ट्रासह परराज्यांतूनही मोठी मागणी होत आहे. -मोहन खोत, अध्यक्ष, हुपरी चांदी कला हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन