कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने अलीकडेच घेतलेल्या एका धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील हजारो स्टेनोग्राफर (लघुलेखक) विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी कोल्हापूर जिल्ह्यामधील तरुण, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान नाट्यगृह परिसरात रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली. आंदोलक विद्यार्थ्यांच्या हातात आपल्या मागण्यांचे फलक झळकत होते. त्याने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्र शासनाने ०५ मे रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार लघुलेखक (स्टेनोग्राफर) हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांची खडतर मेहनत घ्यावी लागते. लघुलेखक या पदाबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा विश्वासात न घेताच हा निर्णय अचानक लादल्यामुळे हे विद्यार्थी नोकरी आणि रोजगारापासून पूर्णपणे वंचित राहत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
बाह्य यंत्रणेला महत्व
या कौशल्याचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असल्याने, हे विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून इतर पदांसाठी टिकू शकत नाहीत. त्यामुळे हा थेट विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर अन्याय असल्याचा सूर आंदोलनातून उमटला. एका बाजूला शासनाच्या विविध विभागांमध्ये जसे की मंत्रालय, महसूल, वन, जीएसटी, गृह, जलसंपदा, कृषी आणि इतर विभागांमध्ये साधारणपणे २५०० पदे रिक्त आहेत. गेली ७ ते ८ वर्षांपासून या पदांसाठी कोणतीही नवीन जाहिरात आलेली नाही. मात्र, दुसरीकडे गरज असताना हेच पद कायमस्वरूपी बंद करून बाह्य यंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिंग) भरून घेण्याचे निर्देश दिले जात आहेत. याचा विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला आहे.
स्टेनोग्राफर प्रश्न ऐरणीवर
या सर्व पार्श्वभूमीवर, शासनाने घेतलेला हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि लघुलेखक (स्टेनोग्राफर) हे पद पुनर्जीवित करावे, अशी आक्रमक मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच संबंधित सर्व विभागांमधील रिक्त असलेल्या अडीच हजार पदांची एकत्रितपणे आणि १०० टक्के भरती प्रक्रिया ताबडतोब राबवावी, जेणेकरून राज्यातील हजारो होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल, अशी आर्त हाक या आंदोलनाद्वारे देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात झालेल्या या निदर्शनामुळे राज्यभरातील स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली असून, आता शासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रावर उमटली रक्ताक्षरे
या आंदोलनादरम्यान एका व्यथित परीक्षार्थिने मुख्यमंत्र्यांना थेट रक्ताने पत्र लिहून आपल्या उध्वस्त झालेल्या भविष्याची आणि वर्षानुवर्षे केलेल्या कष्टाची हाक दिली. विद्यार्थ्यांच्या या जीवघेण्या आणि भावनिक संघर्षाने उपस्थित सर्वांचेच मन हेलावून सोडले असून, यातून त्यांच्या व्यथेची व हतबलतेची तीव्र जाणीव होत आहे. शासनाने या रक्ताने लिहिलेल्या पत्राची गंभीर दखल घेत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी आर्त मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.
