कोल्हापूर : महावितरणच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजवापराची योग्य नोंद होऊ नये, यासाठी केलेला प्रकार महावितरणच्या तपासणीत उघडकीस आला आहे. या वीजचोरी प्रकरणी बेनिक्रे (ता.कागल) येथील स्वरूप स्टोन क्रशरशी संबंधित अनंत कुलकर्णी व अमोल कुलकर्णी यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. महावितरणच्या मुरगूड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शरदकुमार संकपाळ यांनी हा गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारीनुसार २३ जुलै रोजी कागल तालुक्यातील स्वरूप स्टोन क्रशर येथील वीजजोडणीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मीटरमधील पूर्वीच्या वीजवापराच्या नोंदींचा विदा डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला असता तोही उपलब्ध झाला नाही. त्यानंतर २४ जुलै रोजी मीटर क्रमांक २११०४३४७ व सीटी क्रमांक युई – ८८७७ जागेवरून काढून सील करण्यात येऊन पुढील तपासणीसाठी महावितरणच्या तपासणी विभागाकडे पाठविण्यात आले.

तपासणीदरम्यान मीटरच्या अंतर्गत जोडणीमध्ये फेरफार करून वापरलेल्या विजेची योग्य नोंद होणार नाही, अशी व्यवस्था केल्याचे आढळून आले. तसेच मीटरमधील पूर्वीचा विदा डाउनलोड होत नसल्याचेही निदर्शनास आले. यावेळी ग्राहकाच्या वतीने अमोल कुलकर्णी व युवराज तिराळे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.तपासणीतील निष्कर्षांच्या आधारे, विद्युत कायदा २००३ मधील तरतुदीनुसार वीजवापराचे पुनर्मूल्यांकन करून १६ लाख ४० हजार ६७० इतक्या रकमेचे वीज देयक २८ सप्टेंबर रोजी देण्यात आले. संबंधित ग्राहकाला ही रक्कम भरण्यासाठी ४८ तासांची नोटीस देण्यात आली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही रक्कम न भरल्याने १ ऑक्टोबर २०२६ रोजी महावितरणच्या वतीने भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

या वीजचोरी तपासणी मोहिमेत महावितरणचे सहाय्यक अभियंता संतोष सरवळे, मार्गशीर्षा चौगुले, मुख्य तंत्रज्ञ अमोल जाधव व जनमित्रांचा सहभाग होता. मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे, वीजवापराची नोंद कमी करण्याचा प्रयत्न करणे किंवा अनधिकृत वीजवापर करणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

दर्जेदार सेवा पुरवा

कोल्हापूर जिल्हा महावितरण महसूलाच्या दृष्टीने महत्वाचा असून येथे थोड्या कालावधीकरता खंडित होणारा पुरवठा आर्थिक दृष्ट्या मोठा प्रभाव टाकतो.  तसेच येथील ग्राहक प्रामाणिक असून तो वेळेवर विजबिल भरतो. त्यामुळे जिल्ह्यात अखंड व अधिक दर्जेदार वीजपुरवठा द्या. त्याकरिता प्रत्येक वीजवाहिनीची देखभाल दुरूस्ती करा, आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी ठेवा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक(वितरण) अंकुर कावळे यांनी दिले.महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ऊर्जा शक्ति सभागृहात ‘जिल्ह्यातील संवेदनशील वीज वाहिन्या व त्यावर करावयाची कार्यवाही’ या अनुषंगाने आढावा बैठकीत कार्यकारी संचालक(वितरण) अंकुर कावळे बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे उपस्थित होते.