कोल्हापूर : कोल्हापूर शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असताना त्यांना पकडून उपचार करण्यासाठी पुरेसे डॉक्टर उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे अशा डॉक्टरांना निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी अन्य महापालिकेच्या तुलनेने सुमारे तीन पट कमी मोबदला देऊन बोळवण केली जात आहे. एकूणच मोकाट कुत्र्यांचा उच्छाद रोखण्यासाठी वार्षिक २५ लाखाची रक्कम पाण्यात जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.कोल्हापूर महापालिकेची स्थायी समितीची बैठक आज पार पडली. यावेळी सदस्यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांचा, त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाचा, निर्बीजीकरणाचा मुद्दा उपस्थित केला.

दरवर्षी निर्बीजीकरण केले जात असेल तर हे काम आता पूर्ण होणे गरजेचे असतानाही ते का केले जात आहे, असा प्रश्न अमर समर्थ यांनी विचारला. आदिल फरास यांनी वर्षाला २५ लाख रुपये खर्च करून निर्बीजीकरणाचे काम समाधानकारक नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. साळोखे नगरात कुत्र्यांचे आश्रयस्थानाचा बाजूच्या लोकांना त्रास होत असल्याचा मुद्दा मांडला. इंद्रजीत बोंद्रे यांनी प्रभागातून उचलले जाणारे श्वान कोठे ठेवले जातात याचा तपशील देण्याची मागणी केली. शिवाजीनगर मध्ये भर वस्तीमध्ये पाळणाघर चालवण्यास, पशुपक्षी केंद्र करण्यास परवानगी आहे, का असा प्रश्न पूर्वा राणे, प्रवीण सोनवणे यांनी उपस्थित केला.

निर्बीजीकरणाचे काम अमाधानकारक

सभापती विशाल शिराळे यांनी निर्बीजीकरणाचे काम समाधानकारक नसल्याचे सांगत प्रशासनाच्या गलथानपणावर नाराजी व्यक्त केली. श्वानांची संख्या वाढतच आहे. निर्बीजीकरण व श्वान यांच्या संख्येची नोंदी ठेवाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

११ हजार शस्त्रक्रिया

यावर महापालिका प्रशासनाने ग्रामपंचायत हद्दीतील कुत्र्यांवर याचे खापर फोडले. महापालिकेला लागून ग्रामपंचायत असलेल्या श्वानांचे निर्बीजीकरण आवश्यक आहे. शहराच्या हद्दीमुळे ग्रामीण भागातील श्वानांची ये जा असते. आजपर्यंत ११ हजार निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या आहेत.

फुकापासरी काम

त्यासाठी डॉक्टर मिळत नाहीत. अन्य महापालिकेत शस्त्रक्रियेसाठी १४०० रुपये दिले जात असताना कोल्हापुरात अवघे ४० रुपये दिले जातात. ही रक्कम आता ५०० रुपये केली जाणार आहे. हलसवडे येथे नवीन आश्रयस्थान (शेल्टर ) उभारले जात आहे. घरामध्ये सुरू असणाऱ्या कुत्र्यांचे आश्रयस्थानला नोटीस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हे काम होते

कोल्हापूर महापालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि रेबीजच्या समस्येवर मात करण्यासाठी मोहीमराबवण्यात येत आहे महापालिकेने यासाठी ‘सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन’ (सॅप) आणि नागपूरच्या ‘निर्मिती संस्थे’सोबत करार केले आहेत. कोल्हापूरमधील पांजरपोळ संस्थेच्या आवारात निर्बीजीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून तिथेच शस्त्रक्रिया आणि उपचारांची विनामूल्य सोय केली आहे. कोल्हापूर महापालिकेने भटक्या कुत्र्यांना थेट रस्त्यावर किंवा सोसायटीच्या आवारात खाद्य देण्यावर निर्बंध आणले असून, यासाठी अधिकृत ‘फीडिंग झोन’ निश्चित करण्यात आले आहेत。 या झोनबाहेर कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी मनपाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

ट्रॅक्टरचा बेबंद कारभार

याच सभेत महापालिका भाडेतत्त्वावर घेत असलेल्या ट्रॅक्टरचा वापर, फेऱ्या, दर यावरून सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ठेकेदार ठरलेल्या पेक्षा कमी फेऱ्या मारत असल्याचे प्रवीण सोनवणे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रशासनाने या तक्रारीत सत्यता आढळल्यास ठेका रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट केले. ट्रॅक्टरला आठ तासासाठी २७०० भाडे देण्यात येते. मनपाकडे सध्या ४१ ट्रॅक्टर असल्याचा खुलासा करण्यात आला.