कोल्हापूर : मागील हंगाम २०२५-२६ मधील उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ५२५ रुपये मिळावा, यावर्षीच्या हंगामातील ऊसाला ५ हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी सोमवार पासून शरद जोशी विचार मंचच्या वतीने ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

आज पहिल्या दिवशी आंदोलनाला शेकापचे माजी आमदार संपतराव पवार, भरत पाटील, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, बाजीराव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शिंदे सेनेचे माजी आमदार उल्हास पाटील आदींसह अनेक शेतकऱ्यांनी येऊन पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी ऊस तोडी क्रमपाळीप्रमाणे द्याव्यात, खुशालीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या ऊसतोड मजुरांचा बंदोबस्त करावा, कारखान्यांच्या वजन काट्यामध्ये फेरफार करणाऱ्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, होणारा दंड त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून वसूल करण्यात यावा, या व इतर मागण्यांसाठी शरद जोशी विचार मंचच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या मागण्या बाबत ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे सावकार मादनाईक यांनी सांगितले.

यावेळी एकनाथ शिंदे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, शिवाजी माने, वैभव कांबळे जनार्दन पाटील, रुपेश पाटील, सदाशिव कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, गब्बर पाटील, युवराज आडनाईक, संजय चौगुले, रंगराव पाटील, रावसाहेब डोंगळे, शामराव टिपुगडे, मानाजी पाटील शंकर पाटील, रमाकांत तोडकर, धोंडीराम गुरव आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.