कोल्हापूर : यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी प्रति टन ४५०० रुपये दराच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली दुसरी बैठक निष्फळ ठरली. उद्या शनिवारी पुन्हा एकदा बैठक होणार असून यावेळी तोडगा निघेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
यंदाच्य हंगामासाठी विविध शेतकरी संघटनांनी उसाला प्रति टन ४५०० पासून ते ७ हजार रुपये दरासाठी आंदोलने सुरू केली असल्याने जिल्ह्यातील कारखान्याचे गाळप थंडावले आहे. याबाबत चार दिवसापूर्वी झालेली बैठक निर्णयाविना आटोपली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तोडगा निघेल – आबिटकर
शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य दर देण्याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिले.
बैठकीत गाळप हंगाम सुरु करणे व ऊस दर देणे, भरारी पथकाकडून ऊस वजनकाटा तपासणी करणे, ऊस वाहतूक संघटनांची निवेदने, हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी ,त्यावरील उपाययोजना तसेच ऊस दराबाबत चर्चा केली.
आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर,, राहुल आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रादेशिक सह संचालक (साखर) उज्वला पळसकर, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना अपेक्षित दर आणि कारखानदारांकडून देण्यात येणाऱ्या दरामध्ये तफावत आहे. या दोहोंमध्ये समन्वय साधण्यासाठी पालकमंत्री आबिटकर यांनी कारखानदार, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधींसोबत चर्चा करुन योग्य तो तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार चंद्रदीप नरके यांनीही कारखानदार व शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊनदराबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचे आवाहन केले.
