कोल्हापूर : समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे प्रसारित केल्याच्या निषेधार्थ हिंदूत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला हिंसक वळण लागले. जमावाने शहरातील अनेक भागांत केलेल्या दगडफेकीत वाहने, दुकानांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, या घटनेवरून राजकारण मात्र तापले आहे.
शिवराज्याभिषेक दिनी काल कोल्हापुरात काही तरुणांनी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे प्रसारित केली होती. याबाबतची माहिती काही वेळेतच शहरात सर्वत्र पसरली आणि तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारीच हजारोंच्या संख्येने तरुणांनी एकत्र येऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करीत आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी शहरात अनेक ठिकाणी घरे, दुकानांवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या होत्या. संबंधित तरुणांना अटक करावी, या मागणीसाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बुधवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली होती. त्यास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने पूर्णत: बंद होती. व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट होता. शहरालगतच जिल्ह्याच्या विविध भागांतही आंदोलने करण्यात आली.




सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हिंदूत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते शिवाजी महाराज चौकात जमा झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. तासाभरात ही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. या वेळी जमावाकडून संबंधित गटावर तातडीने कारवाईची मागणी होऊ लागली. तशा घोषणाही सुरू झाल्या. त्यातून पोलीस आणि जमाव यांच्यात संघर्ष झाला. संतप्त जमावाने दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सुरुवातीला लाठीमार केला. या वेळी गटागटाने विखुरलेला जमाव शहराच्या विविध भागांत घुसला. या संतप्त वाहने, दुकानांची तोडफोड केली. अनेक घरांवरही दगडफेक केली. अखेर हा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. त्यानंतर काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या शहरात सर्वत्र शांतता असली तरी तणावाचे वातावरण आहे. रस्त्यांवर दगड, चपला आणि काचांचा खच पडलेला आहे. अनेक मोडलेली, उलटवलेली वाहने रस्त्यावर पडलेली दिसत आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या घटनांचे तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत. कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून हे हेतूपूर्वक घडवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
जिल्ह्यात जमावबंदी
कोल्हापूर शहर, जिल्ह्यात सर्वत्र जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शांतता समितीची बैठकही घेण्यात आली.