कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी बदल करण्यात आले आहेत. संजय चौगुले यांच्याकडे नव्या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्याकडे असणाऱ्या तालुक्यांंची जबाबदारी आता नामदेव गिरी या नव्या जिल्हाप्रमुखांकडे सोपवण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. इचलकरंजी व हातकणंगले तालुका कार्यक्षेत्र असलेले संजय चौगुले यांच्याकडे शाहुवाडी व पन्हाळा या तालुक्याचे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामध्ये बदल करून आता त्यांच्याकडे हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांची जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर या दोन तालुक्यांचे जिल्हाप्रमुख असलेले वैभव उगळे यांना वगळण्यात आले आहे. त्यांना जिल्हा संघटक केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शाहूवाडी, पन्हाळा या दोन तालुक्यांसाठी आता निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे उपजिल्हाप्रमुख नामदेव शामराव गिरी यांची शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी (हातकणंगले लोकसभा) निवड करण्यात आली आहे.