धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे कृष्णा,पंचगंगा नदीपात्राच्या पाण्यात वाढ होऊन आज (मंगळवार) या मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा नृसिंहवाडी तेथे पार पडला. मोहरमची शासकीय सुट्टी असल्याने पवित्र स्नानाकरता भाविकांनी गर्दी केली होती.

गेले दोन दिवस कोयना, राधानगरी या धरण लोट क्षेत्रामध्ये सततधार पाऊस सुरू आहे. कालपासून कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये दहा फुटाने वाढ झाली होती. आज सकाळी ११ वाजता दक्षिण द्वार सोहळा पार पडला. पूर्वाभिमुख दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून कृष्णा नदीचे पाणी आत शिरते व श्री पादुकेवरून ते दक्षिण दारातून बाहेर पडते. या सोहळ्याला दक्षिणव्दार म्हटले जाते. या पाण्यामध्ये स्नान करणे पवित्र मानले जाते. दत्त देवस्थाने सुरक्षित स्थानासाठी दोरखंड बांधलेले होते. श्रींची उत्सव मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी नारायण स्वामींच्या मंदिरामध्ये ठेवण्यात आली आहे.

वाहतुकीला अडसर –

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासांत तब्बल १३ फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील इचलकरंजी शहराकडे जाणाऱ्या कुरुंदवाड – शिरढोण पुलावर पाणी आले आहे. सायंकाळ पर्यंत हा पूल पुर्णपणे पाण्याखाली जाईल. त्यामुळे प्रशासनाने हा मार्ग बॅरिकेट्स लावून वाहतुकीसाठी बंद करावा अशी मागणी होत आहे. तालुक्यातील तेरवाड, शिरोळ, राजापूर हे बंधारे पाण्याखाली गेले असल्याने याही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.