Detailed guide on Kolhapur tourism featuring the best places to visit for a perfect weekend getaway : कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. पंचगंगा नदीच्या काठी वसलेल्या या शहराला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा, कला-क्रीडा, खाद्यसंस्कृती, अर्थव्यवस्था या सर्वच दृष्टीने कोल्हापूर अत्यंत महत्त्वाचं शहर मानलं जातं. त्यामुळे यंदाच्या सुट्टीत तुम्हाला मुंबई-पुणे-कोकणाच्या पलीकडे जाऊन वेगळं काही फिरायचं असेल तर कोल्हापूर नक्की ट्राय करा.. कोल्हापुरात काय काय पाहण्यासारखं आहे हे सांगायला आम्ही आहोत की!

      महालक्ष्मी मंदिर

      दिवसाची सुरुवात दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिराने करा. मंदिराचे कोरीव काम आणि सकाळची शांतता मनाला प्रसन्न करते. दर्शनानंतर मंदिराबाहेरील गल्लीत मिळणारा ‘घावन-चटणी’ किंवा गरम वाफाळलेला ‘मिसळ-पाव’ नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा.

      न्यू पॅलेस

      यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला ‘न्यू पॅलेस’ पाहायला जा. येथील म्युझियममध्ये महाराजांच्या काळातील शस्त्रे, पोशाख आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे. पॅलेसची वास्तू आणि तिथले उद्यान पाहण्यासारखे आहे.

      रंकाळा तलाव

      संध्याकाळच्या वेळी रंकाळा तलावाच्या काठावर फेरफटका मारा. तिथून दिसणारा ‘शालिनी पॅलेस’चा नजारा विलोभनीय असतो. रंकाळा चौपाटीवर कोल्हापुरी राजापुरी भेळ आणि चटपटीत पदार्थांचा आस्वाद घ्या.

      पन्हाळगड

      कोल्हापूरपासून साधारण २० कि.मी. अंतरावर असलेल्या पन्हाळगडावरही तुम्ही जाऊ शकता. बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम, पावनखिंडीचा इतिहास आणि गडावरील थंड हवा तुमची सहल संस्मरणीय करेल. गडावरील ‘पुसाटी बुरुज’ आणि ‘तीन दरवाजा’ नक्की पहा.

      जोतिबा

      पन्हाळ्यावरून उतरताना जवळच असलेल्या जोतिबा डोंगरावर जा. ‘चांगभलं’च्या गजरात गुलालात न्हाऊन निघालेला हा डोंगर भक्तीचा वेगळाच अनुभव देतो.

      कण्हेरी मठ

      कोल्हापूर शहरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर असलेले श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान (कण्हेरी मठ) हे एक अत्यंत महत्त्वाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या मठाला सुमारे १३०० ते १४०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असून तो ‘काडसिद्धेश्वर’ परंपरेचे सर्वोच्च स्थान मानला जातो. येथे सिमेंट आणि मेणाचे ३०० हून अधिक जीवंत भासणारे पुतळे आहेत, जे ग्रामीण जीवनशैली, पारंपारिक व्यवसाय आणि लोकसंस्कृती दर्शवतात. विहिरीवर पाणी भरणारी महिला, गुरुकुल पद्धतीचे शिक्षण, शेतात जेवण करणारा शेतकरी आणि बारा बलुतेदारांची कामे अशा अनेक विषयांवर येथे सुंदर देखावे साकारले आहेत.

      आदमापूर

      कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर हे गाव संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात अत्यंत प्रसिद्ध आहे.बाळूमामांच्या काळात असलेल्या मेंढ्यांचा वंश आजही जतन केला असून, सुमारे ४०,००० मेंढ्यांचे कळप भाविकांद्वारे सांभाळले जातात. या मेंढ्यांचे दर्शन घेणे खूप पवित्र मानले जाते.

      नरसोबाची वाडी

      कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेले नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी) हे दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या नयनरम्य संगमावर वसलेले हे स्थान ‘दत्तप्रभूंची राजधानी’ म्हणून ओळखले जाते.मंदिराचा मुख्य घाट संत एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे मानले जाते.