कोल्हापूर : दोन हजारावरील यूपीआय व्यवहारांवर प्रस्तावित असलेल्या व्यापारी सवलत शुल्काच्या (एमडीआर) विरोधात येथील व्यापाऱ्यांनी शुक्रवा ‘नो यूपीआय डे’ उपक्रम राबवला. व्यापाऱ्यांन यूपीआय ऐवजी रोख व्यवहार स्वीकारून तसेच दुकानांवर ‘नो यूपीआय डे’ संदेशांचे फलक लावून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

तसेच बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर ते पापाची तिकटी मार्गावर व्यापाऱ्यांमध्ये नो यूपीआय डे पाळण्याचे आवाहन करत महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करून नंतर निदर्शने केली. प्रस्तावित शुल्काचा पुनर्विचार करून ते रद्द करण्याची मागणी केली. ‘नो यूपीआय, ओन्ली कॅश’, ‘व्यापारी एकता जिंदाबाद’, ‘व्यापारी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देत महाव्दार रोड परिसर दणाणून सोडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या तत्वांचा संदर्भ घेत अन्यायकारक शुल्काला विरोध करण्यासाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. १५ ऑक्टोबर पासून एमडीआर वर शुल्क आकारणी झाल्यास व्यापारी आपले यूपीआय व्यवहार कायमचे बंद करुन रोखीने व्यवहार स्वीकारतील असा इशारा देण्यात आला..

यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी यूपीआय हा डिजिटल व्यवहारांचा महत्त्वाचा आणि सोयीचा पर्याय आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारांना व्यापाऱ्यांचा विरोध नाही. मात्र, यूपीआय व्यवहारांवर प्रस्तावित एमडीआर लागू झाल्यास त्याचा अतिरिक्त आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडणार असल्याने व्यापारी संघटनांनी या शुल्काला विरोध दर्शविला असल्याचे सांगितले.

किरकोळ व्यापारी २ ते ३ टक्के नफ्याने व्यवसाय करतो. मॉल संस्कृती व ऑनलाईन बाजारामुळे किरकोळ व्यापारी आधीच डबघाईला आहे. एनपीसीआय च्या डेटा नुसार ऑगस्ट महिन्यात जवळपास ३० लाख कोटींचे व्यवहार यूपीआय मार्फत झाले आहेत. शासन २००० रुपये वरील व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआरचा आकारणी होणार असे सांगत असेल तरी त्यावर १८ टक्के जीएसटी प्रमाणे जवळपास अर्धा टक्क्याचा भार व्यापाऱ्यांना सोसावा लागणार आहे.

जे व्यापारी जीएसटी कायद्याखाली नोंदणीकृत नाहीत त्या व्यापाऱ्यांना तर जीएसटीचा परतावा देखील मिळणार नसल्याने त्यांच्यावर कराचा मोठा भार पडणार आहे. व्यापारी प्रामाणिकपणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराचा भरणा करुन देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लावत असतो. पण त्यामानाने शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ त्याला मिळत नाही. १५ ऑक्टोबर पासून एमडीआर वर शुल्क आकारणी झाल्यास व्यापारी आपले यूपीआय व्यवहार कायमचे बंद करुन रोखीने व्यवहार स्वीकारतील असा इशारा दिला.

चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी ‘नो यूपीआय डे’च्या माध्यमातून देशभरातील व्यापाऱ्यांनी आपली एकजूट आणि शासनापर्यंत आपली भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शासनाने आपला निर्णय तात्काळ मागे घेऊन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा असे सांगितले.

चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी यांनी प्रस्तावित एमडीआर मुळे व्यापार क्षेत्रावर होणारा आर्थिक परिणाम लक्षात घेऊन शासनाने व्यापारी संघटनांशी चर्चा करावी आणि व्यापाऱ्यांवरील अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी मेडिकल स्टोअर्स मधील जवळपास ७० टक्के व्यवहार हे यूपीआय मार्फत होत असून यूपीआयवरील अर्धा टक्का शुल्कामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे असे सांगत कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन तर्फे या आकारणीला विरोध दर्शवत असल्याचे सांगितले.

यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, खजानीस विज्ञानंद मुंढे, माजी उपाध्यक्ष संजय पाटील, संचालक जयेश ओसवाल, संपत पाटील, राहुल नष्टे, संभाजीराव पोवार, प्रशांत पोकळे, लक्ष्मण पटेल, अनिल धडाम, सचिन शानबाग, संजीव परीख, राजेश राठोड, शाम जोशी, सुरेश लिंबेकर, श्रीनिवास मिठारी, अरुण सावंत, रमेश कारवेकर, अतुल होनोले, विनोद पटेल, अविनाश नासिपुडे, गुरुदत्त म्हाडगुत, संदीप वीर, मंदार धर्माधिकारी, दीपक बोधे यांच्यासह विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.