कोल्हापूर : नवीन पाण्याचे स्वागत करणारी त्र्यंबोली देवीची यात्रेची धूम करवीर नगरीत पाहायला मिळत आहे. पारंपरिक ‘पी-डब्बाक’च्या निनादाला यावेळी आवाजाच्या भिंतींची जोड मिळाली आहे. परंपरा आणि नवता याचे अनोखे मिश्रण शहरात दिसून येत आहे. गुलालाच्या उधळणीत ‘टेंबलाईच्या नावावं चांगभलं’चा गजर सुरू होता. दिवसभर वाद्यांच्या निनादात नाचणारे कोल्हापूरकर रात्री आषाढ धारा झेलत तांबड्या पांढऱ्यावर मनसोक्त ताव मारतात.
करवीर नगरीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या श्री त्र्यंबोली देवी यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. आषाढ महिन्यात अमावास्येपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार जुन्या कोल्हापूरातील विविध पेठांसह उपनगरांमधून निघणाऱ्या यात्रांमुळे शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे.
या यात्रेचा मुख्य धार्मिक विधी म्हणजे पंचगंगा नदीचे पवित्र कलशातून आणून श्री त्र्यंबोली देवीच्या चरणी अर्पण केले जाते. पंचगंगेचे पाणी पावित्र्य, समृद्धी आणि निसर्गकृपेचे प्रतीक मानले जाते. स्थानिक महिला, कुमारिका आणि भाविक सजविलेल्या कलशांसह डोक्यावरून पाणी वाहत भक्तिभावाने मिरवणुकीत सहभागी होतात. परिसरात पूजा-अर्चा करून जयघोषात हे जल त्रिंबोली देवीस अर्पण केले जाते.
या यात्रेत पारंपरिक ‘पी-डब्बाक’ वाद्याचा घुमणारा नाद, गुलालाची उधळण आणि देवीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून जाते. बदलत्या काळानुसार अनेक मिरवणुकांमध्ये वाद्यांच्या भिंतीचाही समावेश झाला असला, तरी यात्रेचा मूळ धार्मिक आणि सांस्कृतिक गाभा आजही तितक्याच श्रद्धेने जपला जात आहे. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळत आहे.
यात्रेनिमित्त स्थानिक तालीम संस्था – तरुण मंडळे पारंपरिक प्रथेनुसार बकरीचा नैवेद्य अर्पण करून त्याचे प्रसादरूपाने वाटपही करतात. बकऱ्याची मुंडी मिळवण्यासाठी चढाओढ असते. त्यासाठी दराची बोली लावली जाते.
श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी देवीची कृपा लाभावी, कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी आणि गाव-शहरावर कोणतेही संकट येऊ नये, अशी प्रार्थना भाविक करतात. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, उद्यमनगर, राजारामपुरी तसेच शहरातील विविध उपनगरांमधून मोठ्या संख्येने यात्रा निघत आहेत. विशेष म्हणजे विविध शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, शासकीय रुग्णालये आणि अनेक सामाजिक संस्थांचाही या धार्मिक परंपरेत उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो.
करवीरच्या लोकजीवनात श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारी त्रिंबोली यात्रा आजही कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांपैकी एक मानली जाते. पिढ्यान् पिढ्या अखंड सुरू असलेली ही यात्रा करवीरच्या अध्यात्मिक वैभवाची साक्ष देत असून, भाविकांच्या श्रद्धेला नवचैतन्य देत आहे.
