कोल्हापूर : कोल्हापूर जवळील उजळाईवाडी येथे मालवाहतूक ट्रॅकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील सरनोबतवाडी येथील महिला रविवारी जागीच ठार झाली. तर पती आणि नात सुदैवाने बचावले. सासूला सुनेला बघायचे राहून गेल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती. राष्ट्रीय महामार्गावर दीड तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारक, प्रवाशातून संताप व्यक्त केला जात होता.

सरनोबतवाडी येथील वसंत जगताप हे पत्नी गीता वसंत जगताप (वय ३९ ) व नातीला घेऊन कागल येथे आजारी सुनेला बघण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान उजळाईवाडी मयूर पेट्रोल पंप ब्रीज जवळ मालवाहतूक ट्रॅकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात बसली होती की गीता जगताप यांना ट्रकने पाच फूट फरफटत नेहले. त्यांच्या डोक्यावरून व अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघाता नंतर ट्रॅक चालक पसार झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर कोंडी

पुणे – बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येथील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या सरनोबतवाडी ते मयुर पेट्रोल पंप ब्रीज पर्यंत वाहनाच्या दिड तास वाहतूक कोंडी झाली होती.कोंडी झाल्याने वाहनधारक, प्रवाशातून संताप व्यक्त केला जात होता. तसेच अनागोंदी वाहतूक करणाऱ्या काही वाहनधारकांच्या प्रवृत्तीवर कोरडे ओढले जात होते.

रुग्णवाहिकेस वाट मिळेना

अपघात स्थळापर्यंत रुग्णवाहिका पोहचण्यात वाट मिळाली नाही. घटनास्थळी उलट्या दिशेने आलेल्या रुग्णवाहिकेतून गीता जगताप यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आला होता. तिथे पंचनामा होऊन सांयकाळी त्यांच्यावर सरनोबतवाडी येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती ,एक मुलगा व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

महामार्ग दूताची मदत

दरम्यान घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलिस कर्मचारी व महामार्ग मृत्युंजय दूत मोहन सातपुते होते. यांनी वाहतूक कोंडी फोडली.