कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने, गारपिटीने मोठा धुमाकूळ घातला. सुमारे तासाभराच्या जोरदार पावसाने परिसर जलमय झाला. फळबागांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले. कडक उन्हाच्या लाटेनंतर अवकाळी पाऊस, वाऱ्यामुळे तापमानात घट झाली.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दुपारी कडक उन्ह तर रात्री हवेत गारवा दिसून येत आहे. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा दिला होता. लोकांना सावध राहण्याचा इशारा आपत्ती विभागाने दिला होता.

आज सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडाटसह पाऊस झोडपून काढत होता. गारांचा सडा रस्तोरस्ती पाहायला मिळत होत्या. भर पावसात गारा वेचण्याचा आनंद मुले घेत होती. रस्त्यांवरून नाले वाहू लागले होते. अनेक भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.

शेतीला जबर फटका

या पावसामुळे शेतीला जबर फटका बसला. द्राक्षे, केळी, पपई, बाजरी, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपिटीमुळे कलिंगडाची शेती जमीनदोस्त झाली. गारपिटीच्या तडाख्यातील कलिंगड खाण्यासाठी काढता येणार नाही, आतून नासतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.