कोल्हापूर : मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी झोडपून काढले. जिल्ह्याच्या सर्व भागात मुसळधार पाऊस झाल्याने सकाळी जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोनतीन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम सरी आल्या होत्या. आज सकाळी जिल्ह्याच्या सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिणेकडील राज्यात पाऊ स पडत आहे. त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे. आज सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती. विजेचा कडकडाट होत सकाळी आठ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. तुफानी पावसामुळे जिल्हा जलमय झाला. जनजीवन विस्कळीत झाले होते. याचा मोठा फटका शेतीला बसला. पावसाचे भात शेतीचे अतोनात नुकसान झाले.

शेतकरी यामुळे हवालदिल झाला आहे. भात पिकाची निम्मी कापणी झाली अजूनही शिवारात पीक काढणीच्या अवस्थेत आहे. तर शेतात कापून टाकलेल्या भाताला कोंब फुटले आहेत.  नाचणी पिकाची मळणीबाबत शेतकरी चिंतेत आहे. आजच्या पावसाने शेतकरी गर्भगळीत झाला आहे, असे आजरा तालुक्यातील सातेवाडी येथील शेतकरी बी. डी. कांबळे यांनी सांगितले.