कोल्हापूर : विकासवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा ठराव बुधवारी कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीचे सभा आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर , सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत झाली. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. या निर्णयाचे आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्वागत करण्यात आले.

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील नवोदित क्रिकेटपटूंना सुसज्ज दालन उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्याचा आस्वाद क्रीडा रसिकांना घेता येणार आहे. हे स्टेडियम लवकर साकारले जावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत तत्परतेने केली जाईल, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नव्हे तर या स्टेडियमसाठी १५ एकर जागा प्रस्तावित होती. परंतु स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी अजितदादांच्या प्रयत्नाने ३० एकर जागा मंजूर करण्यात आली आहे, असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.

शाहू मिल स्मारक

कोल्हापुरातील शाहू मिल मध्ये स्मारक करण्याबाबत नव्याने आराखडा केला आहे. तो मुख्यमंत्री , दोन्ही मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

वन्यप्राणी नियंत्रण

चांदोली अभयारण्यात तीन वाघ आले आहेत. तेथे भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात वाघांच्या हल्ल्याची भर पडली तर लोकांना आणखी त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाघांची संख्या किती असावी याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

पुढील सन २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी ५५४ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करत एकूण १०९३ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात उद्या मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत तो सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी येथे दिली. 

मंजूर असलेला सर्व निधी मार्च अखेर खर्च व्हावा. ज्या विभागांना अतिरिक्त निधीची गरज आहे त्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे नगरविकास परिवहन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात ७६४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीपैकी आतापर्यंत ३०७ कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित निधी विहीत कालावधीत खर्च करणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ६४२ कोटींपैकी २२९ कोटी, तर विशेष घटक योजनेतील १२० कोटींपैकी ७७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. पुढील सन २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी ५५४ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करत एकूण १०९३ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून यासंदर्भात उद्या मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.