कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीस मोठी गळती लागली असल्याने शहराच्या पाणीपुरवठा उद्या बुधवार व गुरुवार या दोन दिवशी अपुरा व कमी दाबाने होणार असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. यामुळे सणासुदीच्या काळात कोल्हापूरकरांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.बालिंगा ते चंबूखडी येथील ७०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या मोठ्या गळतींची दुरुस्ती करण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत बुधवार व गुरुवार, ९ व १० सप्टेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शहरातील संबंधित भागांचा दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
परिणाम कोणत्या भागात?
या कामाचा परिणाम ए व बी वॉर्डसह संलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नानापाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंट्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड व मंगळवार पेठेतील काही भागांवर होणार आहे.तसेच संपूर्ण सी व डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवारपेठ तालीम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब तसेच संलग्न ग्रामीण भाग व उपनगरांनाही पाणीपुरवठ्याचा फटका बसणार आहे. ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरीतील ५वी, ६वी, ७वी व ८वी गल्ली, कुंभार गल्ली, बागल चौक आदी परिसरातही दैनंदिन पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
थकबाकीदारांना दणका
महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागामार्फत शहर व संलग्नीत ग्रामीण भागात थकबाकीदार व अनाधिकृत नळ कनेक्शनविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळजोडणी खंडीत करण्याची कारवाई वेळोवेळी करण्यात येत आहे. याअंतर्गत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकामार्फत शहरातील विक्रमनगर परिसरात मोठे थकबाकीदार नळ कनेक्शनधारक यांच्यावर कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ६ थकबाकी धारकांची कनेक्शन तोडण्यात येऊन थकबाकीपोटी २ लाख ९५ हजार रुपये रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करण्यात आली आहे.
