पाकिस्तानमधील हल्ल्याचे कोल्हापुरात स्वागत, जल्लोष

भारतीय सैन्याने दहशतवादी तळांवर केलेल्या धाडशी हल्ल्याचे कोल्हापुरात स्वागत करण्यात आले.

पाकिस्तानव्याप्त भागात घुसून भारतीय सैन्याने केलेल्या  हल्ल्यानंतर भाजयुमोच्यावतीने शिवाजी चौकामध्ये लोकांना मिठाई वाटण्यात आली. (छाया- राज मकानदार)

कोल्हापूर : पाकिस्तानव्याप्त भागात घुसून भारतीय सैन्याने दहशतवादी तळांवर केलेल्या धाडशी हल्ल्याचे कोल्हापुरात स्वागत करण्यात आले. आज शहरात विविध चौकात साखर पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. भारतीय वायुदलाच्या जवानांचे छायाचित्र लावून सलाम करण्यात आला. विरोधी पक्षानेही या कारवाईचे स्वागत केले आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी भ्याड  हल्ला केला होता . त्यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानवर हल्ला चढवावा अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करीत होते. या भावना प्रत्यक्षात उतरल्याचे आज दिसून आले.

पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारताच्या वायुदलाने आज पहाटे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. त्यामध्ये सुमारे ३०० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त पुढे आले.

भारताने केलेल्या या लष्करी कामगिरीने सामान्य लोकांतून आनंद व्यक्त केला गेला. गल्लीबोळात भारतीय वायुदलाच्या जवानांचे छायाचित्र लावून सलाम करण्यात आला.

भाजपने साखर पेढे आणि जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. भाजयुमोच्यावतीने शिवाजी चौकामध्ये लोकांना मिठाई वाटण्यात आली. भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. भाजयुमोचे सरचिटणीस गिरीश साळोखे, उपाध्यक्ष विश्वजित पवार, प्रसाद  मोहिते, अमित माळी  यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काँग्रेसकडून स्वागत

भारतीय वायुदलाच्या कामगिरीचे विरोधी पक्षाकडून स्वागत करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पुलवामा हल्ल्याचा जबरदस्त बदला भारतीय वायुदलाने घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ३०० अतिरेक्यांना ठार मारण्याचा पराक्रम केला आहे. आता थेट पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणी त्यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kolhapurkar welcome air strike on terror camps in pakistan