कराड : ​कोयना धरण पाणलोटक्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश तुफान पावसामुळे धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे. अवघ्या दीड दिवसात तासांत धरणातील जलआवक सव्वादोन पटीने झेपावल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने शनिवारी सकाळी १० वाजता कोयनेचे सहाही वक्र दरवाजे थेट सहा फुटांपर्यंत उचलले आहेत. त्यामुळे सध्या कोयना नदीपात्रात ३३,८२६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा धोका निर्माण होताना, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

( नद्यांना पूर अन्, महापुराचा धसका! )

दरम्यान, पश्चिम घाटातील धुवांधार आणि अवर्षणग्रस वगळता सर्वदूर कोसळणार्‍या संततधारेमुळे नद्यांना पूर आला असून, कृष्णा- कोयनाकाठच्या जनतेने महापुराचा धसका घेतला आहे. खरिपाच्या सरतेशेवटच्या पेरण्या ठप्प झाल्या आहेत. शेतशिवार आणि रस्ते जलमय होताना, वाहतूक संथ झाली आहे. स्थावर मिळकतींचे नुकसान झाले आहे.

(​प्रचंड जलआवक व विसर्ग)

​शुक्रवारी कोयना पाणलोटात झालेल्या बेसुमार पावसामुळे धरणातील जलआवक ५९,६४३ क्युसेकवर पोहोचली आहे. त्यामुळे गुरुवारी एक फुटावर असणारे दरवाजे टप्प्याटप्प्याने वाढवत ३१ जुलैच्या मध्यरात्री चार फुटांवरून, शनिवारी एक ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सहा फुटांपर्यंत उघडावे लागले. सांडव्यावरून ३२,७७६ क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक असा एकूण ३३,८२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे.

( कोयना धरण सध्यस्थिती )

कोयना धरणात शनिवारी सकाळी आठ वाजता ​एकूण पाणीसाठा ९०.०३ टीएमसी/ अब्ज घनफूट ( धरण क्षमतेच्या ८५.५४ टक्के ) तर ​उपयुक्त जलसाठा: ८४.९१ टीएमसी ( ८४.८० टक्के ) राहिला आहे. ​धरणात ५९,६४३ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पायथा विद्युत गृहासह कोयनेच्या सहा वक्र दरवाजातून ३३,८२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या ​२४ तासांतील कोयना पाणलोटक्षेत्रातील कोयनानगरला १७७ मिमी ( ७ इंच), नवजा येथे २०५ मिमी (८ इंच) असा बेसुमार पाऊस झाला आहे .

(​ अतिसतर्कतेचा इशारा कायम )

​सततच्या मुसळधारेमुळे खरिपाच्या अंतिम टप्प्यातील पेरण्या ठप्प झाल्या असून, वाहतूक खोळंबली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतीचे साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.