कराड : कोयना धरण पाणलोटक्षेत्रात आज शुक्रवारी पहाटे ढगफुटी झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढली. तर, दिवसभरातील मुसळधारेमुळे धरणसाठा नियंत्रित ठेवून कृष्णा, कोयना नद्यांचा संभाव्य महापुराचा धोका टाळण्याचे आव्हान कोयना धरण प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. कोयनेप्रमाणे बहुतेक जलाशयातून जलविसर्ग सुरु करण्यात आल्याने पश्चिम महाराष्ट्रात पूर, महापुराचे भय दाटले आहे. सर्वदूरच्या उभ्या पावसामुळे खरिपाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर, जनजीवनही विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नुकसानीची माहिती समोर येत असून, महामार्गासह बहुतेक ठिकाणची वाहतूक रेंगाळली असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गुरुवारी उघडलेले कोयनेचे सहाही दरवाजे शुक्रवारी एक फुटांवरून थेट तीन फुटांपर्यंत उघडण्याचा निर्णय झाल्याने कृष्णा, कोयना नद्यांना पूर येणार आहे. तर, संततधारेमुळे पश्चिम घटासह कृष्णा, कोयना नद्यांकाठची पुरती दैना उडाली आहे.

पश्चिम घाटातील तुफान पावसामुळे आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कोयनेचे दरवाजे दोन फुटांपर्यंत उचलून ११,६८० क्युसेक जलविसर्ग सुरू करण्यात आला. मात्र, धरणातील जलआवक नऊ तासात दुप्पटीहून अधिक झेपावल्याने रात्री १० वाजता कोयनेचे सहाही दरवाजे तीन फुटांपर्यंत उचलून कोयना नदीत १७,५८५ क्युसेकपर्यंत जलविसर्ग वाढवण्यात आला आहे.

कोयनेतील जलआवक सव्वादोनपट झोपवली

तुफान पावसामुळे सकाळी २५,००५ क्युसेक असलेली कोयना धरणातील जलआवक सायंकाळी थेट ५९,१९४ क्युसेकवर झेपावली. अवघ्या नऊ तासांत धरणातील जलसाठा ८१.८१ टक्क्यांवरून ८३.४५ टक्के (८७.८३ टीएमसी/ अब्ज घनफूट) झाला आहे. ‘एल निनो’ची भीती मोडीत काढत यंदाच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्राचा पाणीप्रश्न निकाली काढला असला, तरी सध्याच्या पूर, महापुराच्या धोक्यामुळे कृष्णा व कोयना नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयनाक्षेत्रात तुफान पाऊस

कोयना पाणलोटात आज शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासात ९४.३३ मिमी. म्हणजेच ३.७१ इंच तर, आजवर एकूण ३,४७५.६६ (एकूण वार्षिक सरासरीच्या ६९.५१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. त्यात नवजाला १११ एकूण ३,६२० मिमी, महाबळेश्वरला ८६ एकूण ३,८२६ मिमी, तर कोयनानगरला ८६ एकूण २,९८१ मिमी. झाला आहे.

कृष्णा- कोयना नद्यांकाठी अतिदक्षता

पावसाचा जोर पाहता सांडव्यावरून विसर्ग आणखी वाढवला जाण्याची दाट शक्यता असल्याने कृष्णा कोयना नद्यांकाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी शेतीचे साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. तसेच स्थानिक ग्रामप्रशासन व महसूल यंत्रणेला सतर्क राहून आपत्कालीन तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.