कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सलग मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि धरणामधील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना सिंचन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडल्यानंतर, आज शुक्रवारी ( दि. ३१ ) सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहाही वक्र दरवाजे दोन फुटांपर्यंत उघडण्यात येणार आहेत. यामुळे नदीपात्रातील विसर्ग थेट ११,६८० क्युसेक ( प्रतिसेकंद घनफूट) होणार असल्याने कृष्णा व कोयना नदीकाठच्या लोकांना आणि ग्रामप्रशासनाला प्रशासनाकडून अतिदक्षता ( ‘हाय अलर्ट’ ) जारी करण्यात आली आहे.

कोयना ​पाणलोटक्षेत्रात महाबळेश्वर, नवजा आणि कोयना परिसर तुफान पाऊस झोडपून काढत असून, धरणातील जलआवक २५ हजार क्युसेकपेक्षा जास्त झाली आहे.

( धरणसाठा ८२ टक्क्यांच्या घरात )

कोयना धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण ८६.११ टीएमसी/ अब्ज घनफूट (८१.८१%) जलसाठा झाला असून, उपयुक्त जलसाठा ८०.९९ टीएमसीवर पोहोचला आहे. ‘एल निनो’च्या भीतीला मोडीत काढत यंदाच्या दमदार पावसाने पश्चिम महाराष्ट्राची पाण्याची चिंता पार मिटवली आहे.

( ​कोयनेची ताजी आकडेवारी )

आज शुक्रवारी ३१ जुलैला सकाळी आठ वाजता कोयना धरणाची पाणीपातळी: २१४८ फूट (६५४.७१० मीटर) आहे. तसेच एकूण जलसाठा ८६.११ टीएमसी (८१.८१ टक्के) तर उपयुक्त साठा ८०.९९ टीएमसी (८०.८८ टक्के) झाला. धरणातील जलआवक २५,००५ क्युसेक (२४ तासात २.१६ टीएमसी) असून, सध्याचा एकूण विसर्ग ६,१२९ क्युसेक आहे. आता

( कृष्णा- कोयनेची पाणीपातळी वाढणार )

​सायंकाळी पाच नंतर होणारा नवा विसर्ग आज शुक्रवारी सायंकाळी वाजलेपासून धरणाचे सहाही वक्र दरवाजे एक फुटावरून आणखी एक फुट असे दोन फुटांपर्यंत उचलून या दरवाजांतून १०,६३० क्युसेक तर पायथा विद्युतगृह विसर्ग १,०५० क्युसेक असा एकूण कोयना नदीत ११,६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे कृष्णा- कोयना नद्यांची पाणी पातळी वाढणार आहे.

( विसर्ग आणखी वाढणार )

कोयना पाणलोटक्षेत्रात सध्या तुफान पाऊस सुरू असताना धरणसाठा क्षमतेने भरण्याकडे वाटचाल आवक करून असल्याने कोयनेच्या सहा वक्र दरवाजातून आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचन विभागाने नदीकाठावरील लोकांनी नदीपात्रात उतरू नये, शेतीचे साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. स्थानिक ग्रामप्रशासन व महसूल यंत्रणेने सज्ज राहून योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.