कराड : पश्चिम घाटमाथा, कोयना पाणलोटक्षेत्र आणि कृष्णा-कोयना नद्यांच्या काठांवर गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे आता आणखी उचल घेतल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या या धडाक्यामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना गती मिळाली असून, शेतशिवार गजबजले आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाचा जलसाठा गतवर्षीच्या आणि आजवरच्या तुलनेत अद्यापही लक्षणीयरीत्या कमी आहे. असे असले तरी, गेल्या २४ तासांत झालेल्या तुफान पावसामुळे धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढली असून कोयना धरण आता एक तृतीयांश भरण्याच्या मार्गावर पोहोचले आहे.

कोयना पाणलोटात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात ३२४.६६ मिमी म्हणजेच तब्बल १२. ७८ इंच आणि वार्षिक सरासरीच्या साडेसहा टक्के पावसाची नोंद झाली आहे.

​पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा, कोयना, वारणा या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. घाटांमध्ये दरडी कोसळणे, नावली भागात भूस्खलन आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे पाचवड फाटा व कोल्हापूर नाक्यावर वाहतुकीची कोंडी झाली असून, रस्ते जलमय झाले आहेत. मोरणा-गुरेघर धरण ६२ टक्के भरून ओसंडून वाहू लागले आहे, तर ठोसेघर आणि वजराई धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. काही ठिकाणी पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की तेथील खरीप हंगामाच्या पेरण्या, टोकण्यांसह शेतीच्या मशागतीची कामेही बंद ठेवावी लागली आहेत.

कोयना पाणलोटक्षेत्रात काल रविवारी रात्री पावसाने रौद्र रूप धारण केले. आणि ​कोयना धरणातील जल आवक जवळपास थेट दुप्पट झेपावली. सध्या कोयना धरणात ७८,३२२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत असून, एकाच दिवसात तब्बल ६.७६ टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची मोठी आवक झाली आहे. हे पाणी एखाद्या मध्यम स्वरूपाच्या धरणाच्या एकूण जलसाठ्या एवढे प्रचंड आहे. पावसाची आणि जलसाठ्यांची निर्माण झालेली प्रचंड मोठी तूट आता भरून निघत असून, धरणाचा जलसाठा मिलिमीटरने नव्हेतर आता इंचा- इंचाने झेपावत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने आगामी दिवसांत कोयनेसह सर्व जलसाठे गतीने भरतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

​धरणाची सद्यस्थिती

आज सोमवारी सहा जुलै सकाळी आठ वाजता ​पाणी पातळी: २०७२’००” (६३१.५४६ मीटर),

​एकूण साठा (Gross): २७.६६ टीएमसी (२६.२८%)

​उपयुक्त साठा : २२.५४ टीएमसी (२२.५१%)

​पाण्याची आवक : ७८,३२२ क्युसेक (६.७६ टीएमसी)

​एकूण विसर्ग शून्य क्युसेक

२४ तासांतील पाऊस मिमीमध्ये

कोयना पाणलोटक्षेत्रात आज सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोयना पाणलोटक्षेत्रात ​३२४.६६ मिमी म्हणजेच तब्बल १२. ७८ इंच आणि एकूण वार्षिक सरासरीच्या साडेसहा टक्के एव्हढा प्रचंड पाऊस झाला आहे. तर यंदा आजवर कोयनेच्या १ जूनपासूनच्या तांत्रिक जलवर्षात १,२६५.५५ मिमी (वार्षिक सरासरीच्या २५.३१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाटेपर्यंत गेल्या २४ तासात पाणलोटक्षेत्रातील कोयनानगर: २५७ मिमी/ १०.११ इंच (एकूण: ९९५ मिमी), ​नवजा: २४४ मिमी/ ९.६० इंच (एकूण: १२७८ मिमी), महाबळेश्वर: ४७३ मिमी/ १८.६२ इंच (एकूण: १५२४ मिमी)

​तुलनात्मक आकडेवारी

कोयना धरणाची गतवर्षी आजरोजी २,१२६ फुट जलपातळी राहताना, पाणीसाठा ६६.४६ टीएमसी ( धरण क्षमतेच्या ६३.१४ टक्के) तर, धरणातील जलआवक ३२ हजार ८९१ क्युसेक राहीली होती. तर, यंदा कोयनेची ७८,३२२ क्युसेकची वगळता इतर आकडेवारी पिछाडीवर राहिली आहे. सध्या कोयना शिवसागराची जलपातळी २,०७२ फुट म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत ५४ फुटांनी कमी आहे. धरणासाठा २६.७७ टीएमसी ( धरण क्षमतेच्या २६.२८ टक्के) उपलब्ध असून, तो गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३८.८० टीएमसी म्हणजेच धरण क्षमतेच्या जवळपास ३७ टक्क्यांनी कमी आहे.