कराड : ‘अल निनो’ आणि कमी पावसाची चिंता सर्वत्र दाटली असली तरी पश्चिम घाटक्षेत्रात त्याचा फारसा फरक जाणवणार नाही. सध्या कोयना धरणात १६.१५ टीएमसी/ अब्ज घनफूट (१५.३४ टक्के) जलसाठा असून, पैकी ११.३० टीएमसी (१०.७३ टक्के) उपयुक्त जलसाठा आहे. आणि जरी पाऊस महिना, सव्वामहिन्याच्या विलंबाने सुरु झाला, तरी याकाळात सिंचन आणि वीजनिर्मिती सक्षमपणे चालण्यासाठी आजचा उपयुक्त जलसाठा पुरेसा असल्याची माहिती ‘कोयना’चे उपअभियंता आशिष जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

कोयना पाणलोटासह पश्चिम घाटक्षेत्रात हवामान खात्याच्या अंदाजानुसार ९२ टक्के पर्जन्यमान झाले, तरी कोयना धरण भरण्यावर किंवा कृष्णा- कोयनाकाठी सिंचनावर फरक पडणार नसल्याचा विश्वास उपअभियंता जाधव यांनी व्यक्त केला आहे.

कोयना पाणलोटात शंभर टक्के पाऊस पडल्यास पावणे दीडशे ते पावणेदोनशे टीएमसी पाण्याची आवक धरणात होते. धरणाची जलसाठा क्षमता १०५.२५ टीएमसी असून, ज्यादाचे होणारे धरणक्षमतेच्या निम्म्याहून अधिकचे पाणी विनावापर सोडून द्यावे लागते; ज्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसतो. यावर्षीही तब्बल ६४.६७ टीएमसी (धरणक्षमतेच्या ६१.४५ टक्के) पाणी विनावापर सोडून द्यावे लागले आहे. त्यामुळे येत्या जलवर्षात ९२ टक्के पाऊस पडला, तरी ‘कोयना’च्या सिंचन व वीजनिर्मितीत कोणतीही बाधा पोहोचणार नाही.

सध्या धरणात ११.१५ टीएमसी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. पाणी वाटप लवादाच्या आरक्षणानुसार पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी ६७.५० टीएमसी आरक्षित पाण्यापैकी ६७.४८ टीएमसी पाणी वापरल्याने हा कोटा संपला आहे. तरीही, तांत्रिक कारणांमुळे वीजनिर्मिती पूर्ण बंद न करता ती मर्यादित प्रमाणात सुरूच राहील. अतिरिक्त अडीच टीएमसी पाणी वापरासाठी मंत्रालयस्तरावर हालचाली सुरू आहेत, तसेच १ जूनपासून नवीन जलवर्ष सुरू होत असल्याने आरक्षित कोट्याचा विषय संपेल असे प्रकल्प प्रशासनाने म्हटले आहे.

या मोसमात धरणात एकूण १८८.४५ टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यापैकी पूर्वेकडे सिंचनासाठी सुमारे ३३, पूरकाळात १४.५३, आणि आपत्कालीन दरवाजातून ६.९१ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सद्यस्थितीत सिंचनासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध असून, वीजनिर्मितीसाठी महिन्याला ५ टीएमसी पाणी लागते. या तांत्रिक आकडेवारीवरून जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘कोयना’च्या पाण्याची कोणतीही चिंता नसल्याचे स्पष्ट होते. नैकृत्य मोसमी पाऊस वेळेत येण्याचे संकेत आहेत. मात्र, नव्या जलवर्षाच्या प्रारंभी आजचा हा पाणीसाठा कमी पावसाच्या खबरदारीपोटी राखून ठेवला जाणार की सिंचन, वीजनिर्मितीसाठी वापरात येणार, याकडे आता कृष्णा-कोयनाकाठाचे लक्ष लागून राहणार आहे.