कराड : महाराष्ट्राची ऊर्जादायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाची ‘दिवसा ओढ आणि रात्री झोड’ अशी वैशिष्ट्यपूर्ण तऱ्हा पाहायला मिळत आहे. नैसर्गिक अनिश्चितता आणि सुरुवातीचा ‘एल निनो’चा प्रभाव लक्षात घेता, प्रशासनाने अत्यंत सावधगिरी बाळगत धरणातील विसर्ग नियंत्रित केला आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना जलाशयात सद्यस्थितीत १०३.७३ टीएमसी म्हणजेच सुमारे ९८.५६ टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरून घेण्याचे नियोजन असल्याने मुख्य दरवाजे बंद ठेवण्यात आले असले, तरी नदी पात्रातील पाण्याचा समतोल राखण्यासाठी व ऊर्जानिर्मितीसाठी पायथा वीजगृहाचे एक केंद्र सुरू करून १,०५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरण व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता किरण कानुगडे याबाबत बोलताना म्हणाले, की वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आवक आणि पावसाचा अचूक अंदाज घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्याला प्राधान्य दिले जात आहे. कोयना धरण क्षमतेने भरून घेण्याला आता प्राधान्य असून, वीज निर्मितीतही मागणीनुसार वाढ केली जाईल.
(पावसाची आकडेवारी अन् नैसर्गिक समतोल)
यंदाच्या हंगामात कोयना क्षेत्रात आतापर्यंत ४,७९५.६६ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ९५.९१ टक्के इतके आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच काळात ४,७७० मिमी (९५.७८ टक्के) पावसाची नोंद झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसात झालेली अल्पशी वाढ आणि सद्या सुरू असलेली १३,३७४ क्युसेक वेगाची जलआवक यामुळे शिवसागर जलाशय पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटातील ही समाधानकारक आवक आगामी काळातील जलसुरक्षेची मोठी हमी मानली जात आहे.
(जुने संदर्भ आणि आधुनिक आव्हाने)
१९६२ मध्ये स्थापन झालेल्या कोयना प्रकल्पाने पश्चिम महाराष्ट्राचा कृषी व औद्योगिक कायापालट केला आहे. भूतकाळात ‘एल निनो’च्या काळात किंवा अवर्षणाच्या वर्षांत धरणातील खालावलेल्या जलसाठ्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे आणि वीजनिर्मितीचे गंभीर संकट निर्माण झाले होते. या ऐतिहासिक धड्यांमधून शिकत, आधुनिक हवामान अंदाजांचा मेळ घालून चालू वर्षी सुरुवातीपासूनच जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले. भूतकाळातील दुष्काळी अनुभवांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञान आणि सावधगिरीचा घातला गेला आहे.
(वर्षभरासाठी दिलासा)
कोयना धरणातील मुबलक जलसाठ्यामुळे यंदाच्या वर्षात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई- पुण्यासारख्या औद्योगिक पट्ट्यासाठी लागणाऱ्या वीजनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच कृष्णा खोऱ्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णतः सुटल्याने शेतकरी वर्ग व नागरिक यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. पुराचा धोका टाळत धरण क्षमतेने भरणे ही प्रशासकीय अभ्यासाची निष्पत्ती असून, या अचूक नियोजनामुळे संपूर्ण राज्याची कृषी आणि औद्योगिक चक्रे अविरत चालू राहण्यास मोठा हातभार लागणार आहे.
