कराड : कृष्णा कालव्याची सुधारणा व बंदिस्तीकरणाच्या कामासाठी भाजपा-महायुती सरकारने तब्बल १२५ कोटी रुपयांच्या निधीला राज्यातील महायुती सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कराड, वाळवा, पलूस आणि तासगाव या चार तालुक्यांतील १३,३६६ हेक्टर सिंचन क्षेत्राचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
कृष्णा कालव्याच्या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होऊन शेतीचे नुकसान होत होते. या प्रश्नी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. गेल्या महिन्यात जलसंपदा मंत्र्यांच्या कराड दौऱ्यादरम्यान, त्यांनी प्रत्यक्ष कालव्याची पाहणी करून समस्येचे गांभीर्य पटवून दिले होते.
या पाठपुराव्याची दखल घेत जलसंपदा विभागाने विशेष शासन निर्णयाद्वारे १५,००० कोटींच्या कर्जाला मंजुरी देऊन याअंतर्गत कृष्णा कालव्याच्या काँक्रीट लायनिंग व बंदिस्तीकरणासाठी तब्बल १२५ कोटींची तरतूद केली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
चार तालुक्यांतील सिंचनाला बळ
कृष्णा कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाण्याची होणारी गळती पूर्णपणे थांबणार आहे. त्यामुळे कराड, वाळवा, पलूस आणि तासगाव या चार तालुक्यांतील तब्बल १३,३६६ हेक्टर शेतीला थेट लाभ होणार असून, शेवटच्या टप्प्यातील (टेल-एंड) शेतकऱ्यांनाही आता वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळणे शक्य होणार आहे.
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश
विधानसभेत आवाज उठवण्यापासून ते जलसंपदामंत्र्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी आणून कालव्याची दुरवस्था दाखवण्यापर्यंत डॉ. भोसले यांनी ठोस भूमिका घेतली. त्यांच्या या प्रभावी पाठपुराव्यामुळेच महायुती सरकारने इतका मोठा निधी तातडीने मंजूर केला, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कटिबद्ध”
“महायुती सरकारने १२५ कोटींचा निधी मंजूर केल्याने कालव्याच्या काँक्रीट लायनिंग व बंदिस्तीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पाण्याची प्रचंड बचत होऊन हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मनापासून आभार मानतो.” — डॉ. अतुल भोसले, आमदार
