कराड : पाठीचा कणा हे मानवी शरीराचे महत्वाचे अंग. ते शरीराला आधार, संरक्षण पुरवतेच; शिवाय छाती व पोटातील अवयवांना सुरक्षित ठेवते, पण या पाठीच्या कण्याला विकृती म्हणजेच ‘स्कोलिओसिस’ आजार होतो, तेव्हा शरीराची ठेवण व संतुलन बिघडते. ज्याचा रुग्णाच्या शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक जीवनावर खोल परिणाम होतो. अशा नऊ ‘स्कोलिओसिस’ग्रस्तांवर कृष्णा रुग्णालयात अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्टरांचा कृष्णा परिवाराने सत्कार केला आहे. तर, विनामूल्य शस्त्रक्रिया लाभार्थींकडून कृष्णा रुग्णालय व उपचारकर्त्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे एका रुग्णावरील शस्त्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च येतो. पण, कृष्णा रुग्णालयाने सामाजिक बांधिलकी जपत, या नऊ रुग्णांना पूर्णपणे विनामुल्य शस्त्रक्रिया करून त्यांना सन्मानाने जगण्याचे नवे धैर्य मिळवून दिले आहे.
कृष्णा विश्व विद्यापीठ आणि अमेरिकेतील ‘स्टँडिंग स्ट्रेट’ संस्थेच्यावतीने ‘स्कोलिओसिस’ग्रस्तांसाठी गेल्यावर्षीपासून कृष्णा रुग्णालयात विशेष तपासणी शिबीर आयोजिले जाते. नुकत्याच झालेल्या शिबीरात २१ ‘स्कोलिओसिस’ग्रस्तांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नऊ रुग्णात तीव्र स्वरूपाची विकृती आढळून आल्याने त्यांच्यावर अत्यंत महागडी असलेली ही शस्त्रक्रिया विनामुल्य व यशस्वी पूर्ण करण्यात आली.
या उपक्रमात अमेरिकेतील ‘स्टँडिंग स्ट्रेट’ संस्थेचे संस्थापक डॉ. रवी बेन्स, संचालक डॉ. टॉड लिंकन, डॉ. अम राय, डॉ. डॅनियल रेसनिक, डॉ. शॉन बेस्ट, मिस डायना डॉबसन, कणाशल्यविशारद डॉ. मयूर कर्डिले यांनी सहभाग नोंदवला. त्यांचा ‘कृष्णा’चे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य विनायक भोसले, कुलपतींचे सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कृष्णा न्यूरोसायन्सेस इन्स्टिट्यूटचे विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. रामदास, प्रशासकीय प्रमुख अर्चना कौलगेकर आदी उपस्थित होते.
सर्व सुविधा एकाच छताखाली
अत्यंत क्लिष्ट आणि जोखमीच्या शस्त्रक्रियांसाठी लागणारे अनुभवी कणाशल्यविशारद (स्पाईन सर्जन्स), मेंदू व मज्जासंस्थातज्ज्ञ (न्यूरोसर्जन्स), भूलतज्ज्ञ, भौतिकोपचारतज्ज्ञ (फिजिओथेरपिस्ट्स) यांचा समन्वित चमू, तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह (ऑपरेशन थिएटर), मज्जासंस्था निरीक्षण व तपासणी (न्यूरोमॉनिटरिंग) आणि सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू) अशा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने आम्ही हा उपक्रम कृष्णा रुग्णालयात राबवित असल्याचे ‘स्टँडिंग स्ट्रेट’चे संस्थापक डॉ. रवी बेन्स यांनी सांगितले.

