सांगली : कृष्णा खोर्‍यातील पाण्याचे नियोजन आणि संचलन करण्याची जबाबदारी कोल्हापूरला हस्तातंरित करण्याची योजना बारगळली असून ही जबाबदारी पुन्हा सांगली विभागावर सोपवण्यात आली आहे. याशिवाय कृष्णेवरील सिंचन व्यवस्था सांगलीकडे आणि वारणेवरील सिंचन व्यवस्था कोल्हापूर विभागाकडेच राहणार आहे.गेल्या वीस वर्षापासून कृष्णा नदीला येणार्‍या महापूरातील पाण्याचे नियोजन करणे, अलमट्टी धरणातून होणार्‍या विसर्गावर नजर ठेवणे, अलमट्टी आणि कोयना धरणातील पाणी विसर्गामध्ये समन्वय साधून योग्य ती पाणी पातळी राखून महापूरापासून होणारे  नुकसान टाळण्याची जबाबदारी सांगलीच्या कार्यालयाकडे आहे.

मात्र, कोल्हापूर येथे मुख्य अभियंता कार्यालय मंजूर झाल्यानंतर यामध्ये बदल करून कृष्णा खोर्‍यातील पूराच्या पाण्याचे नियोजन, समन्वय आणि वारणा, कृष्णा नदीच्या डाव्या बाजूकडील शेती पाण्याचे नियोजन करण्याची आणि पाणीपट्टी वसुली करण्याचे काम सांगलीकडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कार्य कोल्हापूरकडे अशी व्यवस्था करण्यात आली होती. सध्या सांगली विभागाकडे बहे बंधार्‍यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधार्‍यापर्यंतचे सिंचन व्यवस्था, पूर नियंत्रणाचे काम सांगलीकडे होते. ते यापुढेही तसेच राहणार आहे.

पाटबंधारे विभागातील सांगली विभाग २००५ पासून पूर नियंत्रणावर देखरेख ठेवत आला  असून नदीपात्रातील पाण्याची पातळीमध्ये  होणारी वृध्दी, धरणातील विसर्ग याची माहिती संकलित  स्वरूपात सांगली विभागाकडे आहे. ही जबाबदारी यापुढेही सांगली विभागाकडेच राहणार असून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून वरिष्ठांनी याला अनुकूलता दर्शवली असल्याचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी बुधवारी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.