सांगली : दुषित रसायनयुक्त पाणी ओढा, नाला व नदीपात्रात सोडण्याचे बंद करून सात दिवसात अनुपालन अहवाल सादर करा अन्यथा कारखान्याचे औद्योगिक उत्पादन थांबवण्याचे, पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस प्रदुषण नियंत्रण मंडळाने राजारामबापू कारखान्याला बजावली आहे.
कृष्णा नदीत दुषित पाण्यामुळे मासे मरत आहेत. याबाबत विविध ठिकाणी आलेल्या वृत्ताची आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेउन बोरगाव बंधारा येथे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष भेट देउन पाहणी केली. यावेळी फार्णेवाडीत तपकिरी रंगाचे सांडपाणी सोडण्यात आल्याचे आढळले, हे दुषित पाणी नाल्यावाटे नदीत मिसळत असल्याचे दिसून आले. बोरगाव ते बहे मार्गावर फार्णेवाडी नाल्यात काळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याचे दिसून आले. कारखान्याजवळ दुषित सांडपाणी अवैज्ञानिक पध्दतीने साठपा केल्याचे दिसून आले. हे सांडपाणी २० हजार चौरस फूट परिसरात आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले असून यामुळे जलचर प्राणी व मानवी आरोग्यावर परिणाम होत आहेत. पर्यावरणीय नुकसान रोखण्यासाठी कारखान्याच्या आवाराबाहेर दुषित जलसाठा करण्यात येउ नये, पाणी थेट नाला, नदी, कालवा, बंधारा आदी ठिकाणी सोडण्यात येउ नये असे निर्देश राजारामबापू कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.
तसेच याबाबतचा सात दिवसात अनुपालन अहवाल सादर करावा, अन्यथा, कठोर कारवाई करण्यात येईल, औद्योगिक उत्पादन थांबवण्याचे व वीज, पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले जातील असा इशारा नोटिसद्वारे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांनी दिला आहे.
