सांगली :  पावसाने उघडीप दिली असली तरी धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा, वारणा काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे, तर कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने औदुंबरच्या दत्त मंदिरात शनिवारी सकाळी पाणी शिरले. नागठाणे, डिग्रज, सांगलीसह येरळा नदीवरील खटाव ते नांद्रे बंधारा पाण्याखाली गेला आहे. सांगलीत आयर्विन पूलाजवळ पाणीपातळी २६ फूटावर पोहचली असून उद्यापर्यंत ३० ते ३२ फूट पाणी पातळी होण्याची शक्यता पूरनियंत्रण कक्षातून व्यक्त करण्यात आली आहे.

पश्‍चिम घाट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक  वाढती आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना, धोम, कण्हेर, धोम- बलकवडी, उरमोडी व तारळी  धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णेची पाणी पातळीत वाढ होत आहे. शनिवारी सकाळी औदुंबरच्या दत्त मंदिरात यंदाच्या हंगामात दुसर्‍यांदा पाणी शिरले आहे.

दरम्यान, चांदोली धरणातून  ६९०० क्यूसेकचा विसर्ग करण्यात येत असल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. तांदुळवाडीसह कुंडलवाडी, बहादूरवाडी, कणेगाव, भरतवाडी आदी गावातील नदीकाठच्या शेकडो एकर क्षेत्रात वारणेचे पाणी शिरले असून उसासह मका, भुईमूग, भात, सोयाबीन आदी पिके पाण्यात आहेत.कालच्या संततधार पावसानंतर शनिवारी पावसाने पूर्ण उघडीप दिली असून आज दिवसभर उन-सावलीचा खेळ सुरू होता. सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १५.७ मिलीमीटर पाउस  नोंदला गेला असून सर्वाधिक पाउस कडेगाव तालुक्यात २९.१  मिलीमीटर नोंदला गेला.