पाकिस्तानने हेरगिरीचा ठपका ठेवून फाशीची शिक्षा सुनावलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करावी, या मागणीसाठी लोकमत प्रवृत्त होऊ लागले असून, त्यासाठी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शहर शाखेच्या वतीने या मागणीसाठी बुधवारी निदर्शने करण्यात आली. या वेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.

आज दुपारी वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे शिवसेना शहर शाखेच्या वतीने कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करावी या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

या वेळी संतप्त शिवसैनिकांनी झेंडा जाळला. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख दुग्रेश लिग्रस, शिवाजी जाधव, रवि चौगुले, दिनेश परमार यांच्यासह शिवसनिक सहभागी झाले होते.