कोल्हापूर : कोल्हापुरातील धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी ही पश्चिम महाराष्ट्रातील गोविंदा पथक आणि दहीहंडीप्रेमींचे जसे आकर्षण आहे तद्वत ही दहीहंडी भरवल्या जाणाऱ्या ऐतिहासिक दसरा चौकातील चौकात होणारी भाषणबाजी ही आगामी राजकारणावर भाष्य करणारी ठरत असते. परंतु यंदा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा फड रंगला असतानाही आणि मंचावर महायुतीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि संयोजक धनंजय महाडिक हे दोघे प्रमुख असतानाही राजकीय भाषणबाजीवर विरजण पडले. दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या पुत्राचा उल्लेख काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष असा केल्याने त्याची भलतीच चर्चा होऊ लागली आहे.
धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात जवळपास दोन दशके भव्य प्रमाणातील दहीहंडी आयोजित करण्याचे काम केले आहे. काही वेळा करोना टाळेबंदीमुळे ती बंद करावी लागली. तर काही वेळा दहीहंडीचा निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्यात आला. दरवर्षीप्रमाणे कालही महाडिक यांनी दहीहंडीचे जंगी नियोजन केले होते. मात्र त्याला पुरेसे राजकीय वलय लाभले नाही.
राजकीय दहीहंडीची उणीव
गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवली जाणार असल्याचे जिल्ह्यातील महायुतीचे तमाम नेते सांगत आहेत. त्यामुळे दहीहंडीच्या राजमंचावरून त्याबाबत दिशादर्शन होईल अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात धनंजय महाडिक यांचेच काय ते भाषण झाले. गोकुळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा किल्ला लढवणारे हसन मुश्रीफ यांनी काही काळ मंचावर प्रतीक्षा केली. भाषण करण्याची संधी मिळणार नाही याची जाणीव होताच ते निघून गेले. गोकुळवर तीस वर्षे नेतृत्व करणारे महादेवराव महाडिक यांनीही निरोप घेतला. हे दोघे नेते निघून गेल्याने राजकीय घुसळन होणार नाही हे स्पष्ट झाले. आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोक माने, माजी खासदार संजय मंडलिक यांची राजकीय उपस्थिती केवळ दिसण्यापुरती ठरली.
प्रमुखांनी पाठ फिरवली
तथापि, गतवर्षी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जयश्री जाधव, माजी मंत्री भरमू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आदींची उपस्थिती नजरेत भरली होती. यंदा या साऱ्यांनी पाठ फिरवली.
प्रतिमेचे राजरंग
विशेष म्हणजे कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर आमदार अमल महाडिक यांचे छायाचित्र नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अलीकडच्या काळामध्ये सतेज पाटील – अमल महाडिक यांच्यामधील कथित जवळीकीचा तर हा परिणाम नसावा ना अशीही चर्चा होत होती. मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके आदी नेतेमंडळी त्यांच्या समाज माध्यमावर लहान सहान कार्यक्रमाची छायाचित्रे आवर्जून डकवत असतात. परंतु त्यांनी या दहीहंडीची दखल घेतली नसल्याने त्यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकूणच महायुतीमध्ये गोकुळ निवडणुकीबाबत दिखाऊ एकमत असले तरी अंतर्गतरीत्या वादाची घुसळण कुठपर्यंत पोहोचली आहे याची झलकच यातून दिसून आली.
‘काँग्रेस मधील’ कृष्णराज
संयोजक धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे मोदी सरकारकडून होत असलेल्या विकासकामांवर भर देणारे नेहमीचेच एकसुरी भाषण केले. परिणामी या कार्यक्रमातील भाजपची छाया सतत जाणवत राहिली. त्यातील अराजकीय मंच हरवत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विशेष म्हणजे सध्या धनंजय महाडिक हे कृष्णराज महाडिक यांना राजकीय वारसदार म्हणून दणक्यात पुढे आणत आहेत. परंतु काल त्यांचा नामोल्लेख करताना भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष असा करण्याऐवजी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा केला. खरे तर ही बोलण्याच्या ओघात नकळत झालेली चूक. तथापि, महाडिक यांच्यात मूळच्या काँग्रेस संस्कृतीची बीजे अजूनही कशी रुजली आहेत याची शेरेबाजी त्यांच्याच समाज माध्यमाच्या पानावर होत राहिली. इकडे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी या आयत्या ‘नो बॉल’ची संधी साधत महाडिक यांचे हे विधान समाज माध्यमात झपाट्याने अग्रेषित करीत त्यावरून मनसोक्त फटकेबाजी सुरू ठेवत त्याचा आनंद लुटला.
