scorecardresearch

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीतील ‘लाखाची गोष्ट’; तीन लाख कार्यकर्ते प्रचाराला येण्याच्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने चर्चा

निवडणूक म्हटली की दावे-प्रतिदावे यांना जणू उधाण येते. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत एक लाखाची गोष्ट भलतीच चर्चेत आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत चाय पे चर्चा उपक्रम.

दयानंद लिपारे

कोल्हापूर : निवडणूक म्हटली की दावे-प्रतिदावे यांना जणू उधाण येते. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत एक लाखाची गोष्ट भलतीच चर्चेत आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा तीन लाख कार्यकर्ते प्रचाराला येण्याचा मुद्दा लक्षवेधी ठरला आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावरून चंद्रकांतदादांना लक्ष्य केले आहे. खेरीज, चहापानाच्या माध्यमातून सुरू असलेला प्रचारही कुतूहलजनक ठरला आहे.

 कोल्हापुरात पोटनिवडणूक आता रंगात आली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव, भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात खरी लढत असली तरी करुणा धनंजय मुंडे यांच्यासह अन्य तेरा जण रिंगणात आहेत. प्रचाराचा हवा तापू लागली आहे. प्रचारात कार्यकर्ते किती सहभागी झाले आहेत यावरून कोणाचे पारडे जड याचे आखाडे मांडले जात आहेत. निवडणूक म्हटल्यावर आकडे मांडताना ते वाढवून- चढवून सांगितले जातात. लाखो मतदार उमेदवाराच्या पाठीशी असल्याचा दावा तर प्रत्येक उमेदवार, समर्थक आणि नेत्यांकडून वारंवार केला जातो. लाखोंची उधळण ही तर निवडणुकीतील जितकी चर्चेची तितकीच चिंतेची बाब.

अशातच आणखी एका लाखाच्या मुद्दय़ाने कोल्हापूरच्या निवडणुकीत वेगळाच रंग भरला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘ राज्यातील भाजपचे कार्यकर्ते कोल्हापुरात प्रचाराला येतील. एक वेळ अशी येईल की तीन लाख मतदारांसाठी तीन लाख कार्यकर्ते प्रचाराला येतील’ असे विधान केले आहे. हे विधान भलतेच लक्षवेधी ठरले असून त्यावरून विरोधकांनीही शंकास्पद प्रश्न उपस्थित करतानाच समाजमाध्यमातून मिम्सद्वारे आमदार पाटील यांच्या या विधानानंतर शेरेबाजी चालवली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी ‘ दादांनी ३ लाख कार्यकर्त्यांची यादी माझ्याकडे द्यावी. कोल्हापूरची लोकसंख्या पाच लाख असताना त्यात तीन लाख लोक आणखी येणार असल्याने त्यांच्या निवासाची सोय पालकमंत्री या नात्याने करावी लागेल.

भाजपचा उमेदवार निवडून येण्याचा दावा असेल तर प्रचारात मोजकेच लोक का दिसत आहेत? बाहेरून कार्यकर्त्यांनाची वेळ आली आहे. आयात उमेदवार दिल्यामुळे कोल्हापुरातील मूळ भाजपचे कार्यकर्ते नाराज का झाले आहेत याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे,’ असे उत्तर त्यांनी दिले आहे. तर, ग्रामविकासमंत्री यांनी स्थानिक लढाईला थेट जागतिक स्वरूप दिले आहे. त्यांनी हा मुद्दा रशिया युक्रेन युद्धाची जोडला आहे.

‘चार राज्यांतील विजयाने मदमस्त झालेला भाजप विधवा भगिनींना हरवण्यासाठी तीन लाख कार्यकर्ते कोल्हापुरात आणणार हा शहराचा अपमान आहे. ३ लाख कार्यकर्ते प्रचाराला आणण्याऐवजी दादांनी इतके कार्यकर्ते युक्रेनच्या मदतीसाठी पाठवून द्यावे,’ असा टोला लावला आहे. तीन लाखांचा मुद्दा हा असा वेगळय़ा अंगाने तापत चालला असून त्यावरील टीका-टिप्पणी पाहता त्याला नवे कंगोरे मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.  भरल्यापोटी प्रचार मतदारांना तिन्ही प्रहर भेटून मत देण्याचा आग्रह केला जात आहे. त्याची सुरुवात उन्हे तापण्यापूर्वी भल्या सकाळी केली जात आहे. प्रभात भ्रमंतीसाठी लोक बाहेर पडल्यावर त्यांना बाग, मैदान, पदपथ येथे गाठून मतदानासाठी आवाहन करणे ही एक प्रचाराची प्रथाच पडली आहे. याच्या जोडीलाच काँग्रेस- भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा खाऊन-पिऊन प्रचार करण्याचा आणखी एक प्रकार चर्चेत आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी चाय पे चर्चा हा उपक्रम सुरू केला आहे.

भरपेट नाश्ता त्यावर काढा देऊन मतदारांशी जवळीक साधली जात आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी तालीम मंडळ, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत झणझणीत मिसळवर ताव मारत आहेत. याच वेळी मतदारांना आपला उमेदवार का निवडून येणे गरजेचे आहे याचीही आठवण करून देण्यास ते मुळीच विसरत नाहीत. एकंदरीत ‘भरल्यापोटी तत्त्वज्ञान’ हा प्रकार कोल्हापुरात दररोज सकाळी दोन्ही पक्षांच्या प्रचाराचा भाग बनला आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lakhachi goshta kolhapur by election discussion statement bjp state president workers campaigning ysh

ताज्या बातम्या